Header Ads

कारंजा दि २१ - रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची कारंजा तालुक्याला भेट : तालुक्यातील ग्राम जानोरी येथील वृक्ष लागवड कामाची पाहणी - minister sandipan bhumare visit karanja

रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांची कारंजा तालुक्याला भेट 

तालुक्यातील ग्राम जानोरी येथील वृक्ष लागवड कामाची पाहणी

कारंजा दि २१ -  रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज, २१ एप्रिल रोजी कारंजा तालुक्यातील जानोरी येथील कामांना भेट दिली. ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ई- क्लास जमिनीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेल्या वृक्ष लागवड कामाची त्यांनी पाहणी केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक डोंगरदिवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे, कारंजा उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, गटविकास अधिकारी कालिदास तापी, जानोरीचे कार्यकारी सरपंच नितीन भिंगारे, ग्रामपंचायतचे सचिव जी. ए. उपाध्ये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जानोरी ग्रामपंचायत अंतर्गत जवळपास ३० एकर ई- क्लास जमिनीवर आवळा, बादाम, कडूलिंब यासह अन्य प्रजातीच्या सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जवळच तयार करण्यात आलेल्या शेततळ्यातून या वृक्षांना कामावरील मजूर पाणी देत असल्यामुळे वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. २७ मजूरांना या कामावर रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती ग्राम सचिव श्री. उपाध्ये यांनी दिली.

जानोरी ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे वृक्ष लागवड करून त्याची चांगली जोपासना केल्याबद्दल ना. भुमरे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांचे कौतुक केले. लोकसहभागातून जानोरी ग्रामस्थ विविध उपक्रम व योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करीत असल्याने यापुढेही नवीन योजना राबविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन ना. भुमरे यांनी यावेळी दिले.

No comments

Powered by Blogger.