Header Ads

Washim Job Fair : १३ ते १५ जुलै दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा : २०० पेक्षा अधिक पदांसाठी होणार ऑनलाईन मुलाखती


१३ ते १५ जुलै दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

२०० पेक्षा अधिक पदांसाठी होणार ऑनलाईन मुलाखती

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन



     वाशिम (जनता परिषद) दि. १० - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १३ ते १५ जुलै २०२० या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे २०० पेक्षा अधिक पदांसाठी यावेळी ऑनलाईन स्वरुपात मुलाखती घेतल्या जाणार असून जिल्ह्यातील पात्र, इच्छुक उमेदवारांनी या मेळाव्यात ऑनलाईन स्वरुपात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.

    कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे जवळपास ३ महिने औद्योगिक आस्थापना, उद्योग-व्यवसाय बंद होते. दरम्यानच्या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी परतले आहेत. आता टप्प्या-टप्प्याने अनेक उद्योग सुरु होत आहेत. हे उद्योग-व्यवसाय पूर्वीप्रमाणेच पूर्ण कार्यक्षमतेने सुरु होण्यासाठी त्यांना मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १३ ते १५ जुलै २०२० या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये वाशिम येथील कांचन जॉब्ज अँड मल्टीसर्व्हिसेस प्रा. लि., सिंधुदुर्ग येथील सेक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लि., अकोला येथील जे. जे. फाईन स्पून प्रा. लि., वाशिम येथील फ्युचर मनी सोर्स इंडिया प्रा. लि., वाशिम येथील जिजाऊ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, अकोला येथील युरेका फोर्ब्ज, वाशिम येथील श्यामलेक्स मल्टीपर्पज सर्व्हिसेस, औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन प्रा. लि. या खाजगी कंपन्या सहभागी होत आहेत.

     १० वी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, १२ वी उत्तीर्ण, पदविका (फार्मसी), पदवीधर (सर्व शाखा) इत्यादी शैक्षणिक पात्रता असणारे १८ ते ४८ वर्षे वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांना इंडस्ट्रीज इन्चार्ज, अकौंटंट, कॉम्प्युटर ऑपरेटर, रिसेप्शनिस्ट, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सेक्युरिटी गार्ड, सेक्युरिटी सुपरवायझर, कुक, पेंटर, हाऊस मेड, असोसिएट्स, वेटर, किचन लेडी, हेल्पर, हाऊस कीपिंग, सेल्स एक्झिक्युटिव्ह यासारख्या २०० पेक्षा अधिक पदांसाठी १३ ते १५ जुलै २०२० या कालावधीत दूरध्वनी, व्हिडीओ कॉलींग, स्काईपच्या माध्यमातून मुलाखत व इतर तत्सम प्रक्रियेद्वारे कंपनी, उद्योजक किंवा प्रतीनिधीद्वारे पात्रतेनुसार निवड करण्यात येईल.

     इच्छुक व पात्र उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर किंवा ‘महास्वयंम’ (Mahaswayam) अॅपच्या माध्यमातून त्यांच्या प्राप्त ‘एम्प्लॉयमेंट कार्ड’वरील युझर नेम व पासवर्डद्वारे लॉगीन करून ‘वाशिम-पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन जॉब फेअर’ या टॅबद्वारे ऑनलाईन सहभाग नोंदवावा. लॉकडाऊन काळात गावी परतलेल्या आणि ‘गुगल फॉर्म’च्या माध्यमातून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे माहिती सादर केलेल्या तसेच जिल्ह्यातील इतर रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.




2 टिप्‍पणियां:

Blogger द्वारा संचालित.