Header Ads

सुक्ष्म नियोजनातून निवडणूक कामकाज यशस्वी पार पाडावे - जिल्हाधिकारी कुंभेजकर - Washim District Collector Kumbhejkar guided - Election work should be carried out successfully through meticulous planning

सुक्ष्म नियोजनातून निवडणूक कामकाज यशस्वी पार पाडावे  - जिल्हाधिकारी कुंभेजकर - Washim District Collector Kumbhejkar guided - Election work should be carried out successfully through meticulous planning


सुक्ष्म नियोजनातून निवडणूक कामकाज यशस्वी पार पाडावे  - जिल्हाधिकारी कुंभेजकर

कारंजा व मानोरा तालुक्यातील निवडणूक तयारीचा घेतला सविस्तर आढावा

Election work should be carried out successfully through meticulous planning - Washim District Collector Kumbhejkar

वाशिम, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका / www.jantaparishad.com) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने तसेच गांभीर्याने काम करावे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे परिपत्रक आणि हँडबुक नीट वाचावे. आतापासूनच सुक्ष्म नियोजन करून निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आज कारंजा आणि मानोरा तालुक्यातील निवडणूक तयारीचा सविस्तर आज त्यांनी आढावा घेतला.यावेळी ते बोलत होते.

कारंजा येथे झालेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी,नगर प्रशासन सह आयुक्त बी.डी. बिक्कड, तहसीलदार कुणाल झाल्टे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, मुख्याधिकारी महेंद्र वाघमोडे तसेच संबंधित नोडल आणि झोनल अधिकारी उपस्थित होते. मानोरा येथील बैठकीस उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, गटविकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल भोरकाडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, कार्यविभाजनाप्रमाणे प्रत्येक अधिकाऱ्याने आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत. झोननिहाय ईव्हीएम सिलींगचे कामकाज करावे लागणार असून वर्कलोड मोठा असणार आहे. त्यामुळे नोडल अधिकाऱ्यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करून घ्यावे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि अचूकता राखण्यासाठी नियोजनावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, जेणेकरून मतदारांची गैरसोय होणार नाही. प्रशिक्षण अधिकारी यांनीच प्रशिक्षण घ्यावे. नोडल अधिकाऱ्यांकडून चोख कामगिरी अपेक्षित आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिटची सोय व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वार्डनिहाय मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी. मतदारांना बीयू व सीयू बाबत माहिती व्हावी यासाठी गणनिहाय जनजागृती करावी. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

आचारसंहिता कक्षाने अनुषंगिक अहवालांचे फॉरमॅट्स आधीच तयार ठेवावेत. खर्च निरीक्षण पथकांनी उमेदवारांच्या खर्चाची माहिती वेळेत गोळा करून वरिष्ठ कार्यालयास सादर करावी. ईव्हीएम मशिन हाताळणीबाबत प्रशिक्षण घ्यावे आणि आरओ हँडबुक मॅन्युअलचे वाचन करून उजळणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निवडणूक निरीक्षकांसाठी निवासाची व्यवस्था सुस्थितीत करून ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, वाहतूक व्यवस्था आधीच आरक्षित करून ठेवावी. पोलिस विभागाने संवेदनशील मतदान केंद्रांची ओळख करून घ्यावी आणि प्रत्येक केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवावा. मतदान केंद्रांवर गर्दी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करावेत, याकरिता पोलिस विभागाने सजग राहावे, असेही त्यांनी निर्देश दिले.

बैठकी दरम्यान उपविभागीय अधिकारी कैलास देवरे आणि तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी निवडणूक नियोजनाचे सादरीकरण केले. तहसीलदार झाल्टे यांनी सांगितले की, कारंजा तालुक्यात एकूण ११० इमारतींमध्ये १४५ मतदान केंद्रे असून १ लाख १९ हजार ४६४ मतदार आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ३ एसएसटी, ४ एफएसटी, ३ व्हीएसटी आणि १ व्हीव्हीटी पथक स्थापन करण्यात येणार असून ६५६ मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी देवरे यांनी निवडणूक तयारीचा आढावा, साहित्य साठवण, मनुष्यबळ नियोजन आणि मतदान केंद्रांवरील उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, या कामकाजासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी उत्कृष्टपणे कार्य करतील.

मानोरा येथील सादरीकरण तहसीलदार डॉ. येवलीकर यांनी केले. त्यांनी सांगितले की, तालुक्यात एकूण १४९ मतदान केंद्रे असून १ लाख २३ हजार ११५ मतदार आहेत. निवडणुकीच्या सुरळीत पार पाडण्यासाठी ४ एसएसटी, ३ एफएसटी, ३ व्हीएसटी आणि १ व्हीव्हीटी पथक स्थापन करण्यात आले असून ८२५ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ नियोजित केले आहे.

ईव्हीएम नोडल अधिकारी विरेंद्र जाधव यांनी ईव्हीएम व्यवस्थापन, मतपत्रिका, टपाली मतदान आणि मतदान केंद्रनिहाय बीयू-सियू सुनिश्चित करणे याबाबत सविस्तर माहिती दिली.

बैठकीला जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या सुक्ष्म नियोजनात्मक मार्गदर्शनामुळे निवडणूक कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक आणि यशस्वी पार पडेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.