Header Ads

१५ नोव्हेंबर पासून मुग, उडिद व सोयाबीन खरेदीला प्रारंभ होणार - Mung Udad Soyabean Kharedi from 15th November

१५ नोव्हेंबर पासून मुग, उडिद व सोयाबीन खरेदीला प्रारंभ होणार - Mung Udad Soyabean Kharedi from 15th November


१५ नोव्हेंबर पासून मुग, उडिद व सोयाबीन खरेदीला प्रारंभ होणार 

शेतकरी बांधवांनो.... नाफेडची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली बरं का...!

आधारभूत दर निश्चित; योग्य भाव मिळविण्याची संधी

वाशिम, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका / www.jantaparishad.com) महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, आणि नाफेड कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून, तर खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

केंद्र शासनाने मुग ८ हजार ७६८ रुपये प्रति क्विंटल,उडिद ७ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल, सोयाबीन ५ हजार ३२८ रूपये प्रमाणे प्रति क्विंटल आधारभूत दर निश्चित केले आहेत.

राज्य शासनाने वाशिम जिल्ह्यासाठी नाफेड ही केंद्रिय नोडल एजन्सी नियुक्ती करून दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या गावाजवळील नाफेडच्या (नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) नजिकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आधारकार्ड,बँक पासबुक,चालू वर्षाचा ७/१२ उतारा,पीकपेरा इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. 

ऑनलाईन नोंदणी पीओएस मशिनद्वारे केली जाणार असून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर खरेदीसाठी एसएमएस प्राप्त झाल्यावर शेतमाल विक्रीसाठी केंद्रावर आणावा.

या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे हा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील तसेच संचालक मंडळाने केले आहे.


कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.