आता जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांना करावी लागणार तीन उल्लेखनीय कामे ! - ZP Washim : Now the employees have to do three remarkable works!
आता जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांना करावी लागणार तीन उल्लेखनीय कामे !
गतीमान प्रशासनाच्या दिशेने सीईओ वाघमारे यांचे आणखी एक पाऊल
वाशिम: दि. 6 (www.jantaparishad.com) - एप्रिल पासून सुरु होणाऱ्या चालू आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी किमान तीन उल्लेखनीय कामे करण्याचे आदेश जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे (ZP Washim CEO Vaibhav Waghmare) यांनी काढले आहेत.
गाव खेड्यातील विकास कामांना गती देण्यासाठी जि. प. प्रशासनही गतीमान असायला हवे या दृष्टीकोणातुन आणि कर्मचार्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वाघमारे यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
याबाबत जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचार्यांना विभाग प्रमुखांमार्फत निर्देश देण्यात आले आहेत.
यानुसार जि प मध्ये करार पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देतांना त्यांनी केलेल्या तीन उल्लेखनीय कामाचा विचार करण्यात येईल. तसेच नियमित कर्मचाऱ्यांच्या सेवा काळातील बऱ्याच बाबींवर निर्णय घेताना त्यांनी केलेल्या तीन उल्लेखनीय कामाचा विचार करण्यात येईल अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या सर्व कार्यालयाशी संबधित कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात तीन उल्लेखनीय कामे करणे आवश्यक झाले आहे.
सुप्त गुणांनाही मिळणार वाव!
सर्व लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, आशा, अंगणवाडी सेविका, एम.ओ., सी.एच.ओ., ज्युनिअर इंजिनिअर, डेप्युटी इंजिनियर, आणि शिपाई सुद्धा या उल्लेखनीय कामातून सुटणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना देण्यात आले आहेत. सीईओ वाघमारे यांनी घेतलेल्या या अभिनव निर्णयामुळे कर्मचार्यांच्या सुप्त गुणांनाही वाव असल्याचे बोलल्या जात आहे. असे असले तरी आता कर्मचार्यांना आपल्या नियमित कामामध्ये काहीतरी वेगळेपण आणावे लागेल किंवा आपल्या जॉब चार्टच्या पुढे जाऊन ग्राम विकासाला पुरक ठरेल अशी उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल हे निश्चित.
--------------------------------------------------
18 गावे मॉडेल करणार: जगदिश साहू
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिलेल्या निर्देशानुसार याबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आपल्या विभागाच्या वतीने जिल्ह्यातील18 गावांमध्ये उल्लेखनीय कामाचे नियोजन केले आहे. याबाबत त्यांनी जिल्हा कक्षाची बैठक घेऊन सुचना दिल्या.
वाशिम जिल्ह्यातील 18 गावांची निवड करण्यात आली असुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक ते दोन गावांचे पालकत्व देण्यात आले आहे. या गावांमध्ये पाणी आणि स्वच्छताविषयक उल्लेखनीय कामे करुन जिल्ह्यातील 'मॉडेल व्हिलेज' ची संख्या वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Post a Comment