Header Ads

कारंजा येथे समता चित्ररथाचा शुभारंभ - Samata chitrarath Karanja showing social welfare scheme

कारंजा येथे समता चित्ररथाचा शुभारंभ - Samata chitrarath Karanja showing social welfare scheme


कारंजा येथे समता चित्ररथाचा शुभारंभ

 समाज कल्याण योजनांची माहिती मिळणार

उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे व तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दाखविला हिरवा झेंडा 

कारंजा दि.८ (www.jantaparishad.com / जिमाका) : समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती नागरिकांना आणि लाभार्थ्यांना व्हावी आणि या माहितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने अनुसूचित जाती उपयोजना सन 2023 -24 या वर्षात समाज कल्याण विभागाच्या महत्त्वपूर्ण निवडक योजनांचा प्रसार प्रसिद्ध करण्यासाठी समता चित्र तयार केला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ आज ८ फेब्रुवारी  २०२४ रोजी कारंजा तहसील कार्यालय येथे करण्यात आला. चित्ररथाला कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे व तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी हिरवा झेंडा दाखविला.

           समता चित्ररथावर कन्यादान योजना, अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य, दुभत्या जनावरांचे गट वाटप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींसाठी निवासी शाळा या महत्त्वपूर्ण योजनांची सचित्र माहिती देण्यात आली आहे.

योजनेच्या लाभासाठी कोणत्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे,लाभाचे स्वरूप आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणाशी संपर्क साधावा याबाबतची देखील माहिती दिली आहे.  

तसेच समता चित्ररथामध्ये असलेल्या ऑडिओ सिस्टीमवरून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलामुलींसाठी निवासी शाळा, छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुलामुलींसाठी शासकीय वस्तीगृहे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना,कन्यादान योजना,अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना,शेळीगट वाटप योजना, दुभत्या जनावरांचे गट वाटप व रमाई आवास योजनांची जिंगल्सच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यात येणार आहे.त्यामुळे अधिक योजनांची माहिती ऐकण्यास देखील मिळणार आहे.

          समता चित्ररथ जिल्ह्यात २० दिवस फिरणार असून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात निवडक गावात  संबंधित लाभार्थ्यांच्या वस्तीत जाणार आहे.त्यामुळे लाभार्थ्यांना व नागरिकांना समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती मिळून भविष्यात त्या योजनांचा लाभ घेणे सोयीचे होणार आहे.

०००

No comments

Powered by Blogger.