Header Ads

लेख : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ - Mata Surakshit Tar Desh Surakshit An Article OR 'Mother is safe, home is safe'

Mata Surakshit Tar Desh Surakshit : माता सुरक्षित तर घर सुरक्षित


लेख : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’

Article: Mata Surakshit Tar Desh Surakshit 

संकलन - जिल्हा माहिती कार्यालय पुणे

        घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी विविध भूमिका अदा करत असताना तिचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाप्रति असणारी प्रेमाची भावना, मातृत्वाचा ओलावा आणि आपल्या कर्तव्याप्रति असणारी संवेदनशीलता यामुळे ती घरासाठी राबते, प्रसंगी स्वत:च्या गरजा, भावना, शरीर, प्रकृती याकडे लक्ष देत नाही. कुटुंबाची काळजी घेणाऱ्या माता-भगिनिंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासनाने नवरात्रीच्या निमित्ताने ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान (Mata Surakshit Tar Desh Surakshit Abhiyan) हाती घेतले आहे.

            राज्यात १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांच्या आरोग्य तपासणीसाठी २६ सप्टेंबरपासून  अभियानाला सुरूवात झाली आहे. येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत जरी अभियान कालावधी असला तरी राज्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी होईपर्यंत अभियान सुरू ठेवण्याचा निर्धार आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

            राज्यातील १८ वर्षावरील महिलांना, मातांना, गरोदर स्त्रीयांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समूपदेशन सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. या काळात सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोगतज्ञामार्फत तपासणी, औषधोपचार, सोनोग्राफी आणि समुपदेशन करण्यासाठी मेडिकल, डेंटल शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. विविध आजाराशी संबंधित तज्ज्ञांचेदेखील सहकार्य घेण्यात येत आहे.

            आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सेवक यांच्यामार्फत घरोघरी जाऊन उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात येत आहे. ३० वर्षावरील सर्व महिलांचे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, कान नाक घसा व इतर आजारांचे निदान व आवश्यकतेनुसार उपचार व समुपदेशन करण्यात येत आहे. अतिजोखमींच्या मातांचे/महिलांचे निदान करून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार आणि संदर्भ सेवा देण्याचे तसेच जास्तीत जास्त महिलांची आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया होतील याचे नियोजन करण्यात आले आहे.  या कालावधीत मानवविकास कार्यक्रमाअंतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, तसेच भरारी पथकामार्फत देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये सेवा पुरविण्यात येत आहेत.

            आरबीएसके पथकामार्फत शाळा तपासणी नंतर गावात भेट देवून तपासणी आणि समुपदेशन कार्यक्रम घेतले जात आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने अंगणवाडी केंद्रात असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची माहिती सर्व स्तरावर देण्यात येत आहे तसेच नवविवाहीत जोडप्यांना व एक अपत्य असणाऱ्या मातांना दोन अपत्यामध्ये अंतर ठेवण्याबाबत तसेच दोन अपत्यावरील मातांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया वरील माहिती देण्यात येणार आहे.

            ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान (Mata Surakshit Tar Desh Surakshit Abhiyan) अभियानाच्या पहिल्या दोनच दिवसातील आरोग्य तपासणीत ४ हजारापेक्षा अधिक महिलांना मधुमेह तर १० हजारपेक्षा अधिक महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास आढळला. वेळीच आजाराचे निदान झाल्याने महिलांना उपचार घेणे सुलभ होणार आहे. आरोग्य शिबिरात औषधे देण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. गंभीर आजारावर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे.

            नवरात्र हा स्त्री शक्तीचा जागर आहे. या उत्सवाच्या महत्वाशी सुसंगतच हे अभियान आहे. महिला शक्तीचे कुटुंबासह देशाच्या विकासात असलेले महत्वाचे स्थान लक्षात घेऊन ती सक्षम असावी यासाठी तिच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेऊन आपण तिच्याप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करूया! घरातील आणि परिसरातील महिलांनी आरोग्य तपासणी करावी यासाठी हे अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहाचवूया!

No comments

Powered by Blogger.