Header Ads

Mata Surkshit Tar Ghar Surakshit Abhiyan : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ सार्वजनिक आरोग्य विभागाचे अभियान

Mata Surkshit Tar Ghar Surakshit Abhiyan : सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’


नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याचा जागर

सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’

Mata Surkshit Tar Ghar Surakshit Abhiyan

            मुंबई, दि. २२ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सव कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ (Mata Surkshit Tar Ghar Surakshit Abhiyan) राबविण्यात येणार आहे. या अभियान कालावधीत राज्यातील अठरा वर्षावरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे सांगितले.

             महिला ही घराचा केंद्र बिंदू असते. हे लक्षात घेवून महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी अभियान राबविण्यात येणार आहे. नवरात्र उत्सवाच्या काळातील या अभियानात आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, आदिवासी विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, शालेय शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग यांचाही सहभाग घेतला जाणार आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

            हे अभियान यशस्वी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यासाठीही सूचना दिल्या आहेत, असे श्री सावंत यांनी सांगितले आहे.

            अभियानात सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत १८ वर्षावरील महिलांची तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज माता आणि महिलांच्या तपासणीची शिबिर घेण्यात येतील. उपकेंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. सावंत यांनी आज दिली.

            या अभियानात महिलांच्या वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेचे प्रमाण याबाबतच्या चाचण्या घेण्यात येतील. आवश्यक वाटल्यास रक्ताच्या चाचण्या, छातीचे एक्सरे आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. कर्करोग, रक्तदाब, मधुमेह याबाबत चाचणी घेतली जाईल. माता आणि बालकांचे लसीकरण केले आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती श्री सावंत यांनी दिली.

            या अभियानात पोषण, बीएमआय आटोक्यात ठेवण्याबाबत तसेच, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती याबाबत समुपदेशन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अभियानाबाबत थोडक्यात

  • आरोग्य विभागाच्या भरारी पथकांद्वारे आदिवासी क्षेत्रांत तपासणी करणार
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या डॉक्टरांकडून गावातील महिलांची तपासणी आणि समुपदेशन केले जाणार.
  • गावातील अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबीराचे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी स्वयंसेविका यांच्या सहकार्याने आयोजन केले जाणार.
  • अभियानात तीन दिवस गर्भवतींची सोनोग्राफी व तपासणी केली जाणार.

No comments

Powered by Blogger.