Header Ads

आणीबाणी काळातील बंदिवास व्यक्तीला मिळणार सन्मानार्थ मानधन - Emolument will be given to the detainee during emergency period

आणीबाणी काळातील बंदिवास व्यक्तीला मिळणार सन्मानार्थ मानधन : 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले


आणीबाणी काळातील बंदिवास व्यक्तीला मिळणार सन्मानार्थ मानधन

31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले

       वाशिम, दि. 27 (जिमाका) : आणीबाणीच्या काळात बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याबाबतची योजना नव्याने सुरु करण्यासाठी राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान/ यथोचित गौरव करण्यासाठी सुरु केलेली योजना जी ३१ जुलै २०२० रोजी बंद करण्यात आली होती. ही योजना नव्याने सुरु करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. या योजनेची अंमलबजावणी ही १ ऑगस्ट २०२२ पासून लागू होईल. ज्या व्यक्तींना यापूर्वी मानधन मंजूर करण्यात आले होते त्यांना ऑगस्ट २०२२ पासून मानधन देण्यात येईल. ३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविलेल्या योजनेंतर्गत मानधन देय केलेल्या लाभार्थ्यांना योजना बंद झाल्याच्या कालावधीपासूनची थकबाकी देण्यात येईल. या योजनेंतर्गत आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना पूर्वीप्रमाणेच १० हजार रुपये दरमहा व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/पतीस ५ हजार रुपये मानधन देण्यात येईल. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना ५ हजार रुपये दरमहा तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस/पतीस २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येईल.

          या धोरणांतर्गत लाभार्थी/ जोडीदार हयात असेपर्यंत मानधनास पात्र राहतील. त्यानंतर वारसदार या मानधनास पात्र ठरणार नाहीत. जिल्हयातील आणिबाणीच्या लढयामध्ये सहभाग घेतलेल्या व्यक्ती ज्यांनी यापूर्वी अर्ज केला नाही त्यांनी ३ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्र व आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत व नमुना-अ आदी कागदपत्रांसह अर्ज 31 ऑक्टोबरपर्यंत (शासकीय सुट्टिचे दिवस वगळुन) जिल्हाधिकारी कार्यालय, (गृह विभाग, पहिला मजला, खोली क्रमांक ११८) येथे सादर करावे. या योजनेतर्गत मानधन मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतील.

          या योजनेंतर्गत ३ जुलै २०१८ च्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या परिशिष्टातील शपथपत्र व आवश्यक कागदपत्राबाबतचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (गृह विभाग, पहिला मजला, खोली क्रमांक ११८) येथून तसेच जिल्हयाच्या  http://washim.nic.in या संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.