Header Ads

वाशिम जिल्हयात १२६ गुरांना लम्पीची बाधा : ९१ हजार जनावरांचे लसीकरण : 126 cattle affected by lumpy in Washim district

वाशिम जिल्हयात १२६ गुरांना लम्पीची बाधा : ९१ हजार जनावरांचे लसीकरण : 126 cattle affected by lumpy in Washim district


वाशिम जिल्हयात 91 हजार जनावरांचे लसीकरण

126 गुरांना लम्पीची बाधा : 51 गुरे उपचारातून बरे

लम्पी चर्मरोगावर नियंत्रणासाठी पशुपालकांना मिळणार आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा

        वाशिम, दि. २१ (जिमाका) - देशातील काही राज्यात गुरांना लम्पी त्वचारोग (Lumpy Skin Disease) चा प्रादूर्भाव झाला आहे. आपल्या राज्यात काही जिल्हयात पाळीवगुरांना लम्पीचा संसर्ग झाला असून जिल्हयातील सहाही तालुक्यात आतापर्यंत 126 गुरांना लम्पीची  बाधा झाली आहे. लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाकडून प्रभावीपणे उपायोजना करण्यात येत आहे. जिल्हयात आतापर्यंत 91 हजार 207 जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून 51 जनावरे औषधोपचारातून बरे झाले आहे. जिल्हयातील ग्रामपंचायती स्वनिधीतून गुरांचे लसीकरण करीत असून जिल्हयात आतापर्यत 64 हजार 828 तर पशुसंवर्धन विभागाने 26 हजार 379  गुरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी दिली.

        लम्पीमुळे जिल्हयातील 24 गावातील 126 गुरे बाधित असल्याचे आढळून आल्याने या गावांच्या 5 किलोमीटर परिघातील 119 गावातील 28 हजार 207 गुरांचे  लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आतापर्यत 5 गुरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला.जिल्हयात लम्पी त्वचारोगाचा संसर्ग अन्य जनावरांना होवू नये यासाठी  जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी  तातडीने याबाबत बैठक घेवून तहसिलदार,गटविकास अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना जनावरांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे जिल्हयात लम्पी प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होवून आजपर्यत 91  हजारांपेक्षा जास्त गुरांचे लसीकरण करण्यात आले.

        गुरांना लम्पीचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी जिल्हयासाठी 53 हजार 935 लस उपलब्ध झाली आहे. 39 हजार 813 जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हयातील गुरे लम्पीने बाधित होवू नयेत यासाठी पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा आणि ग्रामपंचायत यंत्रणा काम करीत आहे. लम्पी  झालेल्या जनावरांचे दूध हे पिण्यासाठी सुरक्षीत असून माणसाला त्यापासून कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे नागरीकांना दूधामुळे लम्पी हा रोग होणार नसल्याचे डॉ. वानखेडे यांनी सांगितले. 


लम्पी चर्मरोगावर नियंत्रणासाठी पशुपालकांना मिळणार आकस्मिक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा

        गोवंशीय पशुधनामधील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकरी  व पशुपालकांकडील पशुधनास आवश्यक त्या सर्व पशुवैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पशुधनातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव नियंत्रणात येईपर्यत सर्व पशुवैद्यकीय दवाखाने सोमवार ते रविवार सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजता पर्यत सुरु राहणार आहे. पशुपालकांना आकस्मीक प्रसंगी 24 तास पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहे. रविवार व सुट्टीच्या दिवशी देखील पशुवैद्यकीय संस्था सुरु राहणार आहें.

No comments

Powered by Blogger.