Header Ads

संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने २७ गावांचा संपर्क तुटला - 27 villages lost connectivity due to flood



संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पुर आल्याने 27 गावांचा संपर्क तुटला

पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचे धाडस करु नका - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

       वाशिम, दि. 08 (जिमाका) : जिल्हयात काल रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्हयातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहे. जिल्हयातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे जिल्हयातील 27 रस्ते बंद झाल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील राजगांव येथील नाल्याला पुर आल्याने राजगांव ते अनसिंग रस्ता, अटकळी येथील नाल्याला पुर आल्याने अटकळी ते येवती रस्ता बंद आहे, तोंडगाव येथील चंद्रभागा नदीला पुर आल्याने वाहतुक बंद आहे, चंद्रभागा नदीला पुर आल्याने वाशिम ते बोरखेडी रस्ता, अडाण नदीला पुर आल्याने पार्डी टकमोर ते जनुना, सोनवड, पार्डी टकमोर ते वाराजहाँगीर रस्ता बंद आहे, बिटोडाजवळील शेत शिवारात नाल्याला पुर आल्याने पार्डी टकमोर ते  वाराजहाँगीर रस्ता, पुस नदीला पुर आल्याने वाराजहाँगीर ते अनसिंग रस्ता बंद आहे, काजळंबा शिवारातील नाल्याला पुर आल्याने येथील कमी उंचीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने तात्पुरता संपर्क तुटला आहे. खरोडा गावाजवळील नाल्याला पुर आल्याने कमी उंचीच्या पुलामुळे तात्पुरता संपर्क तुटला आहे. 

            रिसोड तालुक्यातील खडकी (खंगारे) शिवारात अढळ नदीला पुर आल्याने मालेगांव तालुक्यातील रिठद ते शिरसाळा, शिरसाळा ते खडकी ढंगारे या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने या गावांचा तात्पुरता संपर्क तुटला आहे. रिठद गावाजवळील अढळ नदीला पुर आल्याने रिठद बसस्थानकावरुन गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहन असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.


            मालेगांव तालुक्यातील अमनवाडी, मुसळवाडी, कुत्तरडोह, माळेगांव व धरमवाडी या गावाचा संपर्क काटेपुर्णा नदीला आलेल्या पुलामुळे तुटला आहे. पांगरी (नवघरे) गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरीजवळून वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या पुरामुळे पिंप्री ते खरबी रस्ता, आसेगांव जवळील भोपळपेंड नदीला आलेल्या पुरामुळे आसेगांव ते मंगरुळपीर रस्ता, मोझरीजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे मोझरी ते पिंप्री (बु.), शिवणीजवळील शिवणी नाल्याला आलेल्या पुरामुळे शिवणी ते बसस्थानक रस्ता, वरुड (बु.) गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे, मंगळसा गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरामुळे मंगळसा ते बेलखेड रस्ता आणि मानोलीजवळून वाहणाऱ्या अडाण नदीला आलेल्या पुरामुळे अरक ते निंबी रस्ता बंद आहे. यातील ज्या गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे त्यातील काही गावांना पर्यायी मार्गसुध्दा दुसऱ्या गावाला जाण्यासाठी उपलब्ध आहे.

नागरीकांनी नदी-नाल्यांना पुर आल्यास नदी-नाल्यांच्या काठावर पुर पाहण्यासाठी जाऊ नये. नदी-नाल्यांना पुर असतांना पुरातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. दुचाकी किंवा चारचाकी वाहनेसुध्दा पुराच्या पाण्यातून काढण्याचे धाडस करु नये. पुर ओसरल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला असल्याची खात्री करुनच रस्ता अथवा पुलावरुन वाहने काढावीत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

No comments

Powered by Blogger.