Header Ads

वाढता कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, प्रतिबंध करण्यासाठी लस घ्या, दुर्लक्ष करु नका get vaccinated for safety



वाढता कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, प्रतिबंध करण्यासाठी लस घ्या, दुर्लक्ष करु नका

जिल्हयात 4 जानेवारीपर्यंत पहिला डोस 79.53 टक्के पात्र व्यक्तींनी आणि दुसरा डोस 57.20 टक्के व्यक्तींनी घेतला

वाशिम, दि. 05 (जिमाका) : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा धोका वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबई-पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आपल्याकडे देखील कोरोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अथक परिश्रमातून कोरोनाला प्रतिबंध करणारी लस विकसीत करण्यात आली. देशात 16 जानेवारी 2021 पासून कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. आजपर्यंत देशात अनेकांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या. लसीबाबत गैरसमज असलेल्या व्यक्तींनीच लस घेतली नसल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यास कोविड लस महत्वाची असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय संशोधनातून पुढे आला. अमेरीकेसारख्या प्रगत देशात कॅलिफोर्निया प्रांतात ज्या व्यक्तींनी अद्यापही लस घेतलेली नाही. अशा व्यक्तीच बाधित आढळून येत असल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात येत आहे. काहींना तर आयसीयूमध्ये देखील भरती करण्याची वेळ आली आहे. जगातील विविध देशात सुरु असलेल्या लसीकरणामुळे बाधितांचे प्रमाण कमी दिसत असून मृत्यूदरातही मोठी घट झालेली आहे. यावरुन हे सिध्द होत आहे की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे.

जिल्हयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हयातील सर्वच पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहिम सुक्ष्म नियोजनातून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कोणताही पात्र व्यक्ती लस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. ज्यांनी लसीबाबत गैरसमज करुन घेतले आहे त्यांचे मनपरीवर्तन करुन त्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे.

कोरोनाची तिसरी लाटच जणू सुरु झाल्याची ही चिन्हे राज्यात व जिल्हयात दररोज वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येवरुन दिसत आहे. आता प्रत्येक पात्र व्यक्तीने स्वत:चा व कुटूंबाचा विचार करुन लस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेची दाहकता प्रत्येकाने अनुभवली आहे. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध असतांना ती पात्र व्यक्तीने घेतली पाहिजे. ज्यांनी दोन्ही लसीचे डोस अद्यापही घेतलेले नाही त्यांनी तात्काळ पहिली आणि निर्धारीत वेळेत दुसरी लस घेऊन स्वत:ला सुरक्षित केले पाहिजे. ज्यांनी अद्यापही दोन्ही किंवा लसीचा दुसरा डोस घेतला नाही त्यांच्यावर निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हयात 4 जानेवारीपर्यंत पहिला डोस 79.53 टक्के पात्र व्यक्तींनी आणि दुसरा डोस 57.20 टक्के व्यक्तींनी घेतला आहे. जिल्हयातील सर्वच पात्र व्यक्तींचे दोन्ही डोसचे लसीकरण तात्काळ करण्यासाठी तालुकानिहाय दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील एक नोडल अधिकारी हे जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आणि दुसरे नोडल अधिकारी हे उपजिल्हाधिकारी आहे. राज्यात कोरोनाबाधितांची वाढती रुग्ण संख्या आणि जिल्हयातही आढळून येणारे कोविड रुग्ण पाहता लसीकरण करणे गरजेचे आहे. सोबतच कोविड मार्गदर्शक सुचनांचेही प्रत्येकांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. जिल्हयात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहीली आणि नागरीक कोविडविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करणार नसतील तर जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलून नागरीकांच्या जीवीताचा व आरोग्याचा विचार करुन लॉकडाऊन लावण्याचा निर्णय केंव्हाही घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.