Header Ads

बायोडिझेलचा वापर वाहनात इंधन म्हणून करू नये - Don't use bio-diesel in vehicle appeal by RTO



बायोडिझेलचा वापर वाहनात इंधन म्हणून करू नये

परिवहन विभागाचे आवाहन

वाशिम, दि. २१ (जिमाका) : वाहतुकीसाठी चारचाकी वाहनांमध्ये इंधन म्हणून डिझेलचाच वापर करण्यात यावा. अनेक वाहनधारक कमी किमतीत उपलब्ध होणारे आणि केवळ औद्योगिक वापरासाठी उपयोगात येणाऱ्या बायोडिझेलचा वापर वाहनात इंधन म्हणून करीत आहे, हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यामुळे वाहनात तांत्रिक दोष निर्माण होण्याची शक्यता असते. वाहनांमध्ये थेट इंधन म्हणून बायोडिझेलचा वापर करू नये. असे आवाहन वाशिमचे  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्‍वर हिरडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बसून काही व्यक्ती अवैधरित्या बायोडिझेलची विक्री चारचाकी वाहनांसाठी इंधन म्हणून करीत असल्याचे आढळून आले आहे. मात्र या बायोडिझेलचा वापर केवळ औद्योगिक क्षेत्रासाठी करता येतो. या अवैध बायोडिझेलची किंमत कमी असल्यामुळे अनेक वाहनधारक इंधन म्हणून गाडीत बायोडिझेलचा वापर करीत आहे. यामधून पर्यावरण प्रदूषण निर्माण होते. त्यामुळे अधिकृत पेट्रोल पंपावरूनच डिझेल वाहनांत इंधन म्हणून भरावे. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.   

अशा प्रकारच्या बायोडिझेलचा वापर वाहनात इंधन म्हणून केल्यास वाहनाचे इंजिन,इंजेक्टर आणि फिल्टर खराब होण्याची शक्यता असते. इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. कोणतीही परवानगी न घेता अशाप्रकारे बायोडिझेलची विक्री करणे चुकीचे असल्याचे मत शासकीय तंत्रनिकेतन वाशीम येथील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख प्रा. बावणे यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.