पोळा, मारबत, तान्हा पोळा साधेपणाने साजरा करावा - DM order Pola Marbat Tanha Pola festival
पोळा, मारबत, तान्हा पोळा साधेपणाने साजरा करावा
वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
वाशिम, दि. ०४ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ६ सप्टेंबर २०२१ रोजी पोळा आणि ७ सप्टेंबर २०२१ रोजी मारबत व तान्हा पोळा हे सण साधेपणाने साजरे करण्याबाबत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ४ सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित केले आहेत. हे सण साजरे करतांना सर्वांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर, सॅनिटायझर किंवा हॅण्डवॉशने नियमित हातांची स्वच्छता इत्यादी कोविड त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या आदेशात म्हटले आहे की, यावर्षी वाशिम जिल्ह्यातील गावात, शहरात बैलपोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. शेतकऱ्यांनी त्यांचे बैल सजवून घरीच पूजा करावी. तसेच पोळा निमित्त गर्दी होणार नाही, याची खबरदारी सर्व ग्रामपंचायत आणि नगरपालिका प्रशासनाने घ्यावी. याबाबतची सूचना संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालयाने प्रसिद्ध करावी.
यावर्षी मारबतीची मिरवणूक काढू नये. तसेच तान्हा पोळा निमित्त होणाऱ्या बैल सजावट स्पर्धा, मिरवणुका, शोभायात्रा आयोजित करण्यात येवू नयेत. काही ठिकाणी मारबत व तान्हा पोळ्याच्या दिवशी काही धार्मिक विधी असल्यास अशा विधी कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत घरगुती स्वरुपात करावा. ज्याठिकाणी धार्मिक परंपरा अंमलात आणण्यात येते, तेथे कोविड-१९ संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या नियमांचे, आदेशांचे तंतोतंत पालन करून कार्यक्रम घेण्यात यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.
Post a Comment