वाशिम जिल्ह्यात नॉन-कोविड खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांना दाखल करण्यास मनाई - Ban on admission of Covid patients to non-Covid private hospitals in Washim district
वाशिम जिल्ह्यात नॉन-कोविड खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांना दाखल करण्यास मनाई
कोविड बाधितांना शासकीय रुग्णालयात पाठवावे
वाशिम (www.jantaparishad.com) दि. २५ (जिमाका) - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १६ जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार सर्व खासगी कोविड रुग्णालयांना नॉन-कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याठिकाणी नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बाधित उपचारासाठी अथवा कोरोना चाचणीसाठी दाखल करण्यात येवू नये. अशा रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर साथरोग अधिनियम १८९७ नुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार केलेल्या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. त्यानुसार निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबरोबरच खासगी कोविड रुग्णालयांना नॉन-कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करून ही रुग्णालये नॉन-कोविड रुग्णांच्या उपचारासाठी खुली करण्यात आली आहेत. मात्र, या रुग्णालयांमध्ये नॉन-कोविड रुग्णांसह कोविड रुग्णांवर सुद्धा उपचार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कमी झालेला कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही खासगी नॉन-कोविड रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांना उपचारासाठी अथवा कोरोना चाचणीसाठी दाखल करून घेवू नये. अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. कोणत्याही नॉन-कोविड रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्यास किंवा कोरोना चाचणीसाठी दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालयावर साथरोग अधिनियम १८९७ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.
Post a Comment