28 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर 5 दिवसात वाशिम जिल्ह्यात धडक लसीकरण मोहिम - Dhadak vaccination campaign in Washim district from 28th September to 2nd October
वाशिम जिल्ह्यात 28 सप्टेबर ते 2 ऑक्टोबर या 5 दिवसात धडक लसीकरण मोहिम
वाशिम (www.jantaparishad.com) दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यात कोविड लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. 26 सप्टेंबरपर्यंत पहिला डोस 4 लाख 49 हजार 731 व्यक्तींनी तर दुसरा डोस 2,23,383 व्यक्तींनी घेतला आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण हे राज्याच्या प्रमाणात कमी आहे. लसीकरणाचे हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांनी पुढाकार घेतला आहे. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या पाच दिवसाचा कालावधीत जिल्ह्यातील ज्या गावाचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या गावांची लसीकरणासाठी निवड केली आहे. या गावांमध्ये कार्यरत शिक्षण, कृषि, माविम, उमेद, अंगणवाडी, ग्रामपंचायत, महसूल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करुन कृती आराखडा जिल्हास्तरावरुन तयार करण्यात आला आहे.
लसीकरणाची धडक मोहिम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील 25 रुग्णवाहिका व 8 लसीकरण वाहन याचा उपयोग करुन प्रभागनिहाय लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी तालुकानिहाय पर्यवेक्षणासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.यामध्ये श्री. विवेक बोंद्रे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा.प्र)-मानोरा तालुका, डॉ. संगिता देशमुख (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी)- वाशिम तालुका, श्री. रमेश तागडे (शिक्षणाधिकारी माध्य)-मालेगाव तालुका, श्री. संजय जोल्हे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी(महिला व बाल कल्याण)- रिसोड तालुका,डॉ. श्री. अविनाश आहेर (जिल्हा आरोग्य अधिकारी)-मंगरुळपीर तालुका, डॉ. विनोद वानखेडे(जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी)-कारंजा तालुका यांचा समावेश आहे. वेळापत्रकानुसार संबंधित गावात दवंडी व लाऊडस्पीकरद्वारे कोविड लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली आहे.
कोविड लसीकणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना या लसीकरण मोहिमेचा लाभ घेता येईल.त्यामुळे सर्व घटकांचे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून संरक्षण करणे सोपे होईल. या मोहिमेत शिक्षक, ग्रामसेवक, कृषि सहायक, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, बचतगटाच्या गट संयोजिका, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,धर्मगुरु, प्रभावशाली व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, सुनील निकम यांनी दिली.
Post a Comment