Header Ads

प्रत्येक पात्र रुग्णाला जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Jan arogya yojana for each Eligible patient



प्रत्येक पात्र रुग्णाला जनआरोग्य योजनेचा लाभ द्यावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

  • उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना योजनेविषयी माहिती द्या
  • जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीची सभा

वाशिम, दि. २६ (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची जिल्ह्यात एकत्रित अंमलबजावणी केली जात आहे. अंगीकृत रुग्णालयांमध्ये प्रत्येक पात्र रुग्णांना या जनआरोग्य योजनांचा लाभ देणे बंधनकारक आहे. यामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित रुग्णालय व्यवस्थापनावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा संनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या आज, २६ ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. संदीप हेडाऊ, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजीत सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने द्यावी. तसेच त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन पात्र रुग्णांना योजनेचा लाभ द्यावा. पात्र रुग्णांना जनआरोग्य योजनांची माहिती न देता त्यांच्याकडून शुल्क घेतल्याचे निष्पन्न झाल्यास आरोग्य विभागाने संबधित रुग्णालयावर नियमानुसार कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अंगीकृत रुग्णालयात कोविड-१९ उपचार घेतलेल्या रुग्णांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. तसेच योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त शुल्क घेतल्याच्या ताक्ररींवरील कार्यवाही सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

डॉ. सरनाईक यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी अंगीकृत रुग्णालयांमध्ये कोविड-१९ विषयी उपचार घेतलेल्या रुग्णांचे ५९ तक्रार प्राप्त झाल्याचे सांगितले. छाननीअंती यापैकी १४ अर्ज वैध ठरवून त्यांची नोंदणी योजनेच्या पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यापैकी ६ अर्ज निकाली निघाले असून उर्वरित ८ अर्जांवरील कार्यवाही सुरु असल्याचे ते म्हणाले. तसेच अंगीकृत नसलेल्या खासगी कोविड रुग्णालयातील देयाकांविषयी २९४ तक्रारी प्राप्त झाल्या असून कोविड-१९ देयक पडताळणी पथकाद्वारे सदर तक्रारींची पडताळणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये पात्र लाभार्थ्यांना जर योजनेअंतर्गत कोविड-१९ व इतर अधिसूचित आजारांवर मोफत उपचार मिळाला नसेल, तर असे लाभार्थी जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती जिल्हा कार्यालय, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, हॉटेल रॉयल पॅलेसच्या बाजूला, वाशिम याठिकाणी आपले तक्रार अर्ज सादर करू शकतात. सोबत उपचारासंबंधीत सर्व कागदपत्रे व मूळ बिल अथवा पावती सादर करणे आवश्यक राहील. अंगीकृत रुग्णालयांमध्ये जर रुग्णाने संमतीपत्र देवून स्वखर्चाने उपचार घेतला असेल, अशा रुग्णांचे अर्ज किंवा तक्रारी ग्राह्य धरला जाणार नाहीत.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंगीकृत नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय दरापेक्षा अधिक दराने बिल आकारण्यात आल्याच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेष पथके स्थापन केली आहेत. याबाबतच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेमध्ये सादर करता येतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी यावेळी सांगितले.

No comments

Powered by Blogger.