Header Ads

वाशिम, दि. २८ - मालेगाव तालुक्यातील २३८७ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार 2387 voter names from malegaon tahsil will be removed

मालेगाव तालुक्यातील २३८७ जणांची नावे मतदार यादीतून वगळणार

सात दिवसांत आक्षेप सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. २८ (जिमाका) : मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) स्थळ पंचनामा करून मालेगाव तालुक्यातील २३८७ जणांची नावे मतदार यादीमधून वगळण्यासाठी नमुना ७ चे अर्ज मालेगाव तहसीलदार कार्यालयास सादर केले आहेत. या मतदारांची यादी मालेगाव तहसीलदार कार्यालय, मालेगाव नगरपंचायत, पंचायत समिती कार्यालय, तलाठी कार्यालय तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आणि www.washim.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर कोणलाही काही आक्षेप असल्यास त्यांनी सात दिवसात आपले आक्षेप अर्ज मालेगाव तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी, ३३- रिसोड विधानसभा मतदार संघ यांच्याकडे सादर करावेत.

भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम २०२१ अंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र संकलित करून अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मालेगाव तालुक्यातील १५७ मतदान केंद्रांच्या मतदार यादीमध्ये फोटो नसणाऱ्या मतदारांचे फोटो संकलित करण्यासाठी बीएलओ यांनी त्यांच्या मतदार यादीतील मतदारांच्या पत्त्यावर भेटी दिल्या, मात्र सदर मतदार त्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांचा संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांचे फोटो संकलित करणे शक्य झाले नाही. परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षरीने बीएलओ यांनी याबाबतचा स्थळ पंचनामा केला आहे. अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी २३८७ नमुना ७ अर्ज मालेगाव तहसीलदार कार्यालयात सादर केले आहेत.

मतदार यादीतून वगळण्यात येणाऱ्या २३८७  व्यक्तींच्या नावाची यादी उपरोक्त ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप असल्यास त्यांनी सात दिवसांत आपले आक्षेप अर्ज सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, मालेगाव यांच्या कार्यालयात सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे तहसीलदार, मालेगाव यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.