Header Ads

वाशिम, दि. २४ - जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार अर्थसहाय्य - Licensed rickshaw pullers will get financial assistance

वाशिम जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार अर्थसहाय्य

  • ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास प्रारंभ
  • सुटीच्या दिवशीही कामकाज राहणार सुरु

वाशिम, दि. २४ (जिमाका) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून १५०० रुपये इतके मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. यामध्ये रिक्षाचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मदत कक्ष सर्व कार्यालयीन दिवसांसोबत सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली आहे.

परवानाधारक रिक्षाचालकास http://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज सादर करतांना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. या ऑनलाईन अर्जात वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक,  ऑटोरिक्षा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, आधार क्रमांक नमूद करावा लागेल. वारसदार असल्यास तो पर्यायही निवडावा लागेल. आधार कार्ड ,मोबाईल क्रमांक  आणि बॅंक खाते हे परस्परांशी संलग्न केलेले असणे अनिवार्य आहे. आपल्या अर्जाची प्रत्यक्ष स्थिती अर्जदार आपल्या मोबाईलवर तपासू शकतो.

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालयामार्फत अर्जातील नमूद तपशिलाची कार्यालयातील अभिलेख्यांशी पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मंजूर करुन अर्जदाराच्या बॅंक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने कार्यालयात येण्याची व उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयाच्या मदत कक्षात ९८३४५५९७९७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. रिक्षाचालकांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज कार्यालयीन तसेच सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हिरडे यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.