Header Ads

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल jilha star kruti dal

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल

  • जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी घेतला आढावा
  • १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन

वाशिम, दि. १७ (जिमाका) :  कोरोना विषाणू संसर्गामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १७ मे रोजी या कृती दलाची बैठक घेतली. सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पडण्याच्या सूचना केल्या. तसेच नागरिकांनी अशा बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. जयश्री गुट्टे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक श्रीराम घुगे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सहाय्यक अधीक्षक संजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय कृती दलावर सोपविण्यात आली आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या कृती दलात पोलीस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचा समावेश असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी या कृती दलाचे सदस्य सचिव आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यास संबंधित कोविड हॉस्पिटलने याबाबतची माहिती ‘चाईल्ड लाईन’च्या १०९८ या टोल फ्री क्रमांकावर तातडीने कळवावी. सर्वसामान्य नागरिकांनीही अशा बालकांची माहिती १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कालवून प्रशासनाला सहकार्य करावे. याविषयी माहिती प्राप्त होताच कृती दलाच्या माध्यमातून सदर बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड यांनी जिल्हास्तरीय कृती दलातील सदस्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली. तसेच कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या मुलींची व्यवस्था वाशिम येथील बालगृहात व मुलांची व्यवस्था मानोरा येथील बालगृहात केली जाणार असल्याचे सांगितले.

No comments

Powered by Blogger.