Header Ads

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Don't be unaware of infections in children, see a doctor on time

chief minister maharashtra
लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ऑनलाईन वैद्यकीय परिषदेस वाढता प्रतिसाद

राज्यातील ६ हजार बाल रोग तज्ज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने केले मार्गदर्शन; मुलांमधील कोविडशी संबंधित मानसिक दुष्परिणामांवर देखील चर्चा

मुंबई, दि. २३ मे : कोविड विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेस वाढता प्रतिसाद असून आज या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ज्ञांना राज्य शासनाच्या कोविड विषयक बाल रोग तज्ज्ञ टास्क फोर्सने वैद्यकीय उपचाराबाबत व्यवस्थित मार्गदर्शन केले. मुलांमध्ये कोविड आणि कोविडशी संबंधित मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष देण्यावर देखील चर्चा झाली. लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, कोविडविरुद्धची आपली एकजुटीची साखळी मजबूत ठेवून या विषाणूला पराभूत करू,असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम बाल रोग तज्ज्ञांव्यतिरिक्त इतर संस्था व संघटनांमधील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स आणि हजारो सर्वसामान्य दर्शकांनी विविध माध्यमातून पाहिला. राज्य शासनाने बाल रोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून डॉ.सुहास प्रभू हे या अध्यक्ष तर डॉ.विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. या तज्ज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्गावर मार्गदर्शन केले तसेच वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली.

यावेळी अनेक बाल रोग तज्ज्ञांनी विचारलेल्या प्रश्नांना टास्क फोर्सने उत्तरे दिली. यावेळी मुख्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील यावेळी सुचना केल्या.

dr suhas prabhu

मी केवळ निमित्तमात्र, हे तुमचे यश

यावेळी बोलताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाविरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे.

कोरोना विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करू, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची व्याप्ती वाढत चालली आहे. तिसरी लाट येईल का? आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल? याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलयं. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

dr vijay yewale

पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करा

कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागले यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे, योग्य मार्गदर्शन करावे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाऊले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवीत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीतही १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एकरकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत आणि मला खात्री आहे, जूननंतर लस पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरु करू शकू.

dr paramanand andankar

उपचारांबाबत अनेक शंकांचे समाधान

सुरुवातीला टास्क फोर्सने सादरीकरण केले. कोविडग्रस्त मुलांना स्तनपान, अंगणवाडी सेविकांची भूमिका, यावेळी त्यांनी मुलांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग कसा ओळखावा, सीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नये, मुलांमध्ये सहव्याधी फारशा नसतात पण ज्यांच्यात आहेत त्याना कसे उपचार करावेत, कोविडग्रस्त मुलांची काळजी घेताना पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, मास्क, हात धूत राहणे ही काळजी कशी घ्यावी , घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविडग्रस्त मुलांपासून कसे दूर ठेवावे, कोविडमुळे मुलांमधील फुफ्फुसाचा संसर्ग, मधुमेही टाईप एक मुलांच्या बाबतीत उपचार, मुलांसाठी ६ मिनिटे वॉक टेस्ट कशी करावी, घरी विलगीकरणातील मुलांच्या उपचाराचा प्रोटोकॉल कसा असावा, अशा मुलांना कोविड काळजी केंद्रात घेऊन जाण्याची नेमकी परिस्थिती कशी ओळखायची, कोविडमधील मुलांना खाण्यापिण्याची काय पथ्ये असावीत, अशा मुलांना बीसीजी व इतर लसींच्या बाबतीत काय करावे, मुलांमध्ये म्युकरमायकोसीसची किती शक्यता असते,  मुलांमध्ये हायपोक्सिया होतो का? मुलांना नेमकी कोणती लस द्यावी, लहान मुलांना मास्क घालावा किंवा नाही याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

No comments

Powered by Blogger.