Header Ads

वाशिम दि. 16 मे - कृषि सेवा केंद्र, कृउबास सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा। Apmc will work from 7 to 11

कृषि सेवा केंद्र, कृषि उत्पन्न बाजार समिती सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

वाशिम, दि. १६ (जिमाका) :  कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात २० मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आगामी खरीप हंगाम लक्षात घेवून शेतीशी निगडीत कामे विहित वेळेत पार पडण्याच्या दृष्टीने या काळात जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समिती सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १६ मे रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार, जिल्ह्यातील शेतीशी निगडीत असलेली सर्व कृषि सेवा केंद्र सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना खते, बियाणे शेतीच्या बांधावर अथवा घरपोच उपलब्ध करून देण्यास सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा राहील. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठा कमी पडू नये, यासाठी कृषि संबंधित व्यवसायाबाबत कंपनी प्रतिनिधी यांना निविष्ठांची प्रात्याक्षिके (डेमो) देण्याकरिता सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुभा राहील. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे यांची वाहतूक करण्यासाठी तसेच सदर खते व बियाणे रेल्वे रॅकवरून उतरवून ते गोडाऊनमध्ये साठवणूक करण्याकरीता मुभा देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्याकडे असलेले धान्य विक्री करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या सकाळी ७ वाजेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मशागतीची कामे करण्यासाठी डीझेलची आवश्यकता असते. त्यामुळे ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅनसाठी डीझेल उपलब्ध करून देण्यास मुभा देण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपनीच्या अधिकृत वाहनाला केवळ शेती कामासाठी बांधावर डीझेल उपलब्ध करून देता येईल. यासाठी संबंधित तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आगाऊ सूचना देणे बंधनकारक असेल. कोणत्याही परिस्थिती याद्वारे पेट्रोल विक्री करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे आदेश १७ मे २०२१ रोजीच्या सकाळी ७ वाजेपासून संपूर्ण जिल्ह्यात लागू होती.

या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.