Header Ads

वाशिम दि २८ - ‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईत खाजगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत यावे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे आवाहन Washim DM appeal to private doctors

‘कोरोना’ विरुद्धच्या लढाईत खाजगी डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत यावे

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे आवाहन

शासकीय कोविड रुग्णालयात सेवा देण्यासाठी पुढे येण्याची गरज

वाशिम, दि. २८ (जिमाका) : कोरोना बाधितांवर उपचारासाठी जिल्ह्यात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णवाढ लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने कोविड बाधितांवर उपचारासाठी आणखी खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता आणखी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता भासणार असून जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांनी याकरिता पुढे येवून शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये आपली सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

कोरोना योद्धे म्हणून काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. गेल्या एक वर्षापासून अथकपणे कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या या योद्ध्यांवर सध्या अधिक ताण आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रयत्न सुरु आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आणखी काही खाटांची संख्या वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. एम. डी. मेडिसिन, चेस्ट फिजिशियन, भूलतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासणार असून ही पदे भरण्यासाठी जाहिरात सुद्धा देण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा अशाप्रकारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येवूनही सदर तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होवू शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा शासकीय हॉस्पिटलमध्ये देवून आपल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाच्या मदतीला येण्याची आवश्यकता आहे.

कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आजच्या परिस्थितीत खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत येवून जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे. शासकीय नियमानुसार मानधन तत्वावर किंवा सेवाभावी तत्वावर सेवा देण्याचा पर्याय डॉक्टरांना खुला आहे, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.