दि १२ एप्रिल २०२१ - यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी पोहरादेवी येथे येवू नये - पोलीस अधीक्षक वसंत परदेशी - SP sir appeal to devotees

यात्रा रद्द झाल्याने भाविकांनी पोहरादेवी येथे येवू नये  - पोलीस अधीक्षक वसंत परदेशी 

  • कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करा
  • घरीच राहून विधी, पूजा करण्याचे आवाहन
  • दर्शनासाठी मंदिर बंद राहणार, भाविकांना प्रवेश नाही

वाशिम, दि. १२ (जिमाका) : पोहरादेवी येथे दरवर्षी राम नवमीला संत सेवालाल महाराज जन्मोत्सव यात्रा भरते. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा, २१ एप्रिल रोजी होणारी पोहरादेवी येथील यात्रा रद्द करण्याचा निर्णय पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील महंत, विश्वस्त आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी यावर्षी पोहरादेवी येथे न येता आपल्या घरीच विधी, पूजा करून संत सेवालाल महाराज जन्मोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे. आज, १२ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत असून शासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास कोरोनाचा अधिक फैलाव होत असल्याने सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिरातही भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पोहरादेवी येथे २१ एप्रिल रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबीरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज व महंत सुनील महाराज यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथील धर्मगुरू, महंत यांनी पोहरादेवी येथे भाविकांनी येवू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे भाविकांनी पोहरादेवी येथे न येता घरीच राहून विधी, पूजा करावी.

पोहरादेवी येथील यात्रा रद्द झाली असून मंदिरामध्ये भाविकांना दर्शनसाठी प्रवेश दिला जाणार नाही. गावामध्ये पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने कोणालाही पोहरादेवी परिसरात वाहनाने अथवा पायी प्रवेश देण्यात येणार नाही.  पोहरादेवीच्या सर्व सीमा बंद करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी पोहरादेवी येथे न येता, घरी राहूनच संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी केले आहे.

मिरवणूक, रॅली काढण्यास मनाई

जिल्ह्यात सध्या संचारबंदी आदेश लागू असून गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, रमजान ईद हे सण, उत्सव साजरे करताना मिरवणूक, रॅली काढण्यास किंवा गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई राहणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थिती ५ पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येता येणार नाही. या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...