Header Ads

दि.११ मार्च - वाशिम RTPCR प्रयोगशाळेत २८ दिवसांत २० हजार नमुन्यांची तपासणी

वाशिम ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळेत २८ दिवसांत २० हजार नमुन्यांची तपासणी

सध्या दररोज सरासरी १२०० नमुन्यांची तपासणी

वाशिम, दि. ११ (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात संकलित केलेले स्त्राव नमुन्यांची लवकरात लवकर तपासणी करण्यासाठी वाशिम येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील (आरटीपीसीआर लॅब) अधिकारी, कर्मचारी अथक मेहनत घेत आहेत. दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु असून ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालवधीत २० हजार ११५ स्त्राव नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले आहेत.

गतवर्षी मार्चमहिन्यापासून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांना सुरुवात झाली. मात्र, जिल्ह्यात आरटीपीसीआर प्रयोगशाळा नसल्याने जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या स्त्राव नमुने तपासणीसाठी नागपूर, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये पाठविले जात होते. त्यामुळे सदर तपासणीचे अहवाल येण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागत होते. काही वेळा हा कालवधीत कमी-जात होत होता. त्यामुळे संशयित रुग्णांना अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणमध्ये राहावे लागत होते, तसेच लवकर निदान न झाल्याने त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात अडथळे निर्माण होत होते.

जिल्ह्यातील नागरिकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल लवकर मिळणे आवश्यक असल्याने अखेर वाशिम येथील स्त्री रुग्णालय इमारत परिसरात स्वतंत्र आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली. १० ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे ऑनलाईन स्वरुपात औपचारिक उद्घाटन झाले. सुरुवातीचे काही दिवस प्रयोगशाळेत दिवसाला ३०० नमुन्यांची तपासणी होत होती. त्यानंतर ही क्षमता टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात आली असून आता दिवसला सरासरी १२०० नमुन्यांची तपासणी केली जात आहे.

प्रयोगशाळेमध्ये प्राप्त होणारे नमुने वेळेत तपासून त्याचे अहवाल तातडीने देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या मार्गदर्शनात व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. किशोर लोणकर व डॉ. बालाजी हरण यांच्या नेतृत्वात २ पॅथॉलॉजिस्ट, ११ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), ३ प्रयोगशाळा सहाय्यक (लॅब असिस्टंट) व ४ डाटा एन्ट्री ऑपरेटर अशी कोरोना योद्ध्यांची टीम अथक मेहनत घेत आहेत. दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु आहे. प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ६७ हजार ४५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने आरटीपीसीआर प्रयोगशाळेत दिवसाला सुमारे १२०० ते  १५०० स्त्राव नमुने तपासणीसाठी येतात. हे सर्व नमुने त्याच दिवशी तपासून त्यांचा अहवाल पाठविण्यावर आमचा भर असतो. यासाठी प्रयोगशाळेतील सर्व सहकारी अथक परिश्रम घेत आहेत. सध्या दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरु आहे, अशी माहिती प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. किशोर लोणकर व डॉ. बालाजी हरण यांनी दिली.

सध्या दररोज सरासरी १२०० नमुन्यांची तपासणी

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बाधितांचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांना उपचार उपलब्ध करणे व त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात आला. याकरिता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत जिल्ह्यात २० हजार ११५ स्त्राव नमुने आरटीपीसीआर प्रयोगशाळेत तपासण्यात आले. या कालावधीतील आरटीपीसीआर चाचण्यांचा विचार करता अमरावती विभागात वाशिम जिल्हा क्रमांक दोनवर आहे. ७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान पहिल्या सप्ताहात १५३१ नमुने तपासले गेले, टप्प्या-टप्प्याने यामध्ये वाढ होवून २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या सप्ताहात ८ हजार ७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या दिवसाला सरासरी १२०० नमुने तपासले जात आहेत.

No comments

Powered by Blogger.