Header Ads

दि ०३-०३-२०२१ वाशिम - आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन - इंझोरीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई - suspension of officer by ZP CEO washim

आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या आदेशाचे उल्लंघन
इंझोरीच्या ग्राम विकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

वाशिम, दि. ०३ : कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात हाती घेण्यात आलेल्या उपाय योजनांतर्गत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले होते. या आदेशाचे उल्लंघन करून इंझोरी (ता. मानोरा) येथे २५ फेब्रुवारी रोजी आठवडी बाजार भरविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी इंझोरीचे ग्राम विकास अधिकारी किसन वडाळ यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्ह परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूचा जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा गट विकास अधिकारी यांच्या सभेमध्ये याबाबत वारंवार मौखिक सूचना केल्या आहेत. तरीही २५ फेब्रुवारी रोजी इंझोरी येथे आठवडी बाजार भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे इंझोरी येथे कार्यरत असलेले ग्राम विकास अधिकारी किसन वडाळ यांनी कर्तव्यात कसूर करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला असल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते यांनी १ मार्च रोजी निर्गमित केले आहेत.

No comments

Powered by Blogger.