Header Ads

दि ०३-०३-२०२१ वाशिम - ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती - ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समितीत समावेश Committee presidented by Sarpanch to stop corona

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती

ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समितीत समावेश

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. या समितीमध्ये ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश असून पोलीस पाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

अत्यावश्यक कामाशिवाय गावातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन करणे. गृह विलगीकरण करण्यात आलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयास सादर करणे, एकाच ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत, याची दक्षता घेणे. विशेषतः लग्न समारंभ व इतर गर्दीचे कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे. वेळोवेळी दिलेल्या वेळेतच आस्थापना, दुकाने सुरु राहू शकतील. वेळेआधी किंवा वेळेनंतर आस्थापना, दुकाने सुरु राहणार नाहीत, याची खात्री करणे. सर्व आस्थापनांमध्ये गर्दी न होता दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवून, मास्क, सॅनिटायझरचा वापर होत असल्याबाबत खात्री करणे. सेवांच्या सर्व ठिकाणांवर हात धुण्याची व्यवस्था करणे. गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून त्यांचे निर्जंतुकीकरण करून घेणे. कोरोना संसर्गाची लक्षणे असणारी व्यक्ती आढळून आल्यास तातडीने तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी गावस्तरावर स्थापन केलेल्या समित्यांना दिले आहेत. आजरोजी अस्तित्वात असलेल्या तसेच भविष्यात निर्गमित होणाऱ्या आदेशानुसार या समित्यांनी कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.