Header Ads

वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी

वाशिम, दि. ०२ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशान्वये, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशानुसार शनिवार,  १० एप्रिल २०२१ रोजी वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे व आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, वैवाहिक वाद, भू-संपदान प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे (मनाई हुकुम दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद) या संवर्गातील प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

तरी ज्या पक्षकारांची वर नमूद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी १० एप्रिल रोजी आपली प्रकरणे आपसांत सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवावा. तसेच संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे व विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अॅड. छाया मवाळ यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.