Header Ads

दि.१२ मार्च - खाजगी आस्थापनाधारकांच्या कोरोना चाचण्या जलदगतीने करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

 

खाजगी आस्थापनाधारकांच्या कोरोना चाचण्या जलदगतीने करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

  • जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा
  • प्रतिबंधित क्षेत्रातील सर्वांची कोरोना चाचणी आवश्यक
  • होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा

वाशिम, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारकांच्या कोरोना चाचणीची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज, १२ मार्च रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, राज्य उत्पादन शुल्क अतुल कानडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे, तहसीलदार विजय साळवे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात सध्या दररोज सरासरी १४०० ते १५०० कोरोना चाचण्या होत आहेत, चाचण्यांची संख्या वाढवून दररोज सुमारे दोन हजार चाचण्या करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सामग्री उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु आहेत. सर्व खाजगी आस्थापनाधारक व तेथे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची कोरोना चाचणी होणे बंधनकारक आहे. त्यासाठी आस्थापनाधारकांच्या संघटनांचे सहकार्य घ्यावे, शहरी व ग्रामीण भागात विशेष मोहीम राबवावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याही कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात ज्या भागात जास्त कोरोना बाधित आढळले आहेत, त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित करून तेथील नागरिकांची कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना बाधित आढळलेल्या परिसरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहे, या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करावी. बाधिताच्या संपर्कात आलेल्या प्रत्यके व्यक्तीची चाचणी होईल, याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी झाल्याशिवाय त्या परिसरातील व्यावसायिक आस्थापना सुरु करण्यास परवानगी देवून नये, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

बाधित आढळलेल्या व्यक्तीला गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) ठेवण्याची परवानगी देताना, सदर व्यक्तीकडे नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. होम आयसोलेशनमधील कोणताही रुग्ण नियमांचे उल्लंघन करणार नाही, याची दक्षता घ्यावी. याकरिता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दररोज गृहभेटी देवून माहिती घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा अचानक गृहभेटी देवून संबंधितांकडून नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना श्री. सिंह यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात कोरोना सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करावी. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कोरोना लसीकरणाला गती देण्याच्या सूचना

जिल्ह्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला गती द्यावी. सध्या जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांसह ३८ लसीकरण केंद्र कार्यान्वित असून प्रत्येक केंद्रांवर दररोज किमान १०० व्यक्तींचे लसीकरण केले जाईल, यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करून ग्रामीण भागातही जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थितविषयी माहिती दिली. तसेच संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, त्यांची अंमलबजावणी याविषयी माहितीचे सादरीकरण केले.

No comments

Powered by Blogger.