Header Ads

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा; बेजबाबदारपणे वागणार्‍यांवर कारवाई करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे निर्देश

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवा;
बेजबाबदारपणे वागणार्‍यांवर कारवाई करा
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे निर्देश

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढत असल्यामुळे बाधितांचे प्रमाणही वाढत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींच्या कोरोना चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता बेजबाबदारपणे वागणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

आज, १ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि कोरोना लसीकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जास्तीत जास्त बाधित रुग्णांचा शोध व्हावा, यासाठी दररोज १३०० पेक्षा अधिक चाचण्या कराव्यात. अमरावती जिल्ह्याच्या शेजारी कारंजा तालुका असल्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. एका रूग्णामागे २० संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यात याव्यात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या-ज्या क्षेत्रासाठी ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

नगरपालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना मालकांची तसेच तेथे काम करणाऱ्या कामगार वर्गाची कोरोना चाचणी बंधनकारक करावी, असे सांगून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोणीही कोरोना आजार लपविणार नाही, याची खात्री नगरपालिकांनी करावी. शहरी भागातील विविध क्षेत्रात कोरोना चाचणीचे शिबीर आयोजित करावे. जिल्ह्यातील कोणत्याही गावात आठवडी बाजार भरले जाणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा परिषदेने घ्यावी. संबंधित गावात आठवडी बाजार भरणार नाही, याची जबाबदरी संबंधित ग्रामसेवकांची राहील. अन्यथा ग्रामसेवकाला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. पुढे म्हणाले, जे बाधित रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, ते गृह विलगीकरणात राहून बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. विशेषतः नगरपालिका क्षेत्रातील अशा रुग्णांवर जास्त लक्ष द्यावे. नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात यावे. जिल्ह्यातील तपासणी नाक्यांवर पोलिसांसोबत आरोग्य कर्मचारी नियुक्त करावेत. लग्न समारंभात २५ पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहिल्यास प्रति व्यक्ती ५०० रुपये दंड आकारण्यात यावा. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आजपासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, सर्वांचे व्यवस्थित लसीकरण झाले पाहिजे, याबाबत दक्षता घ्या. लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळण्यात यावा. खाजगी रुग्णालयामध्ये लसीकरण केलेल्या व्यक्तींवर तीन दिवस निगराणी असावी. ग्रामीण भागात सुद्धा कोरोना लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच जास्तीत जास्त ठिकाणी लसीकरणाचे नियोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी लसीकरण नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. पोलीस विभाग ८४ टक्के, महसूल विभाग ५३ टक्के, जिल्हा परिषद ३९ टक्के, आरोग्य विभाग ६८ टक्के आणि खाजगी हेल्थ वर्कर्स यांचे ४७ टक्के लसीकरण झाल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी लसीकरण बंद राहणार असून लसीकरणासाठी निवड केलेल्या खाजगी रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र हा मदतीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.