Header Ads

कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती


 कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती

प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या प्रचार मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, अमरावती विभागामार्फत जिल्ह्यात कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या चित्ररथाला आज, १ मार्च रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला.  

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सोनखासकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती

माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या डिजीटल चित्ररथ तसेच कलापथकाद्वारे कोरोना विषयक जनजागृती संदेश व लसीकरणाचा प्रसार होईल. या मोहिमेमुळे लसीकरणाविषयी लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर होतील. या मोहिमेअंतर्गत डिजिटल चित्ररथ वाशिम शहर तसेच जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जावून कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत विषयी प्रचार व प्रसिद्धी करणारआहे. या चित्ररथ निर्मितीकरिता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे.

डिजीटल चित्ररथाद्वारे जिल्ह्यात दरदिवशी आठ ते दहा गावात प्रचार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले. या मोहिमेकरीता अंबादास यादव, श्रीकांत जांभुलकर यांनी संयोजन केले. शाहीर मधुकर गायकवाड आणि संच कोरोना आणि आत्मनिर्भर भारत याविषयी जिल्ह्यातील नागरिकांना कलापथकाच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.