Header Ads

गावठाणातील मिळकतीचे ‘स्वामित्व’ होणार निश्चित - Ownership of properties in the village will be fixed

Dron


गावठाणातील मिळकतीचे ‘स्वामित्व’ होणार निश्चित

Ownership of properties in the village will be fixed

ग्रामस्थांना मिळणार मिळकत पत्रिका
६४१ गावांमध्ये ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण

वाशिम, दि. १४ (जिमाका) : ग्रामीण भागातील गावठाणांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, तसेच त्याचा नकाशा व सीमा याविषयी माहिती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून गावठाणातील जागाधारकाच्या जमिनीचे मोजमाप करून त्याचा मालकी हक्क अधिकृतपणे देण्यासाठी जिल्ह्यात स्वामित्व योजना राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत ड्रोनद्वारे जिल्ह्यातील ६४१ गावांमधील गावठाणांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात गावठाणामध्ये राहणाऱ्या व्यक्तींकडे त्यांच्या मिळकतीचे अभिलेख, अधिकृत मालकी हक्काचा पुरावा नसल्याने त्यांना बँक कर्ज मिळविणे किंवा मालमत्ता हस्तांतरण करताना तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या मिळकतधारकांची मोठी गैरसोय होते. तसेच गावठाणाचे नकाशे, अभिलेख नसल्याने विविध विकास योजना राबविताना ग्रामपंचायतींना सुद्धा अडचणी येतात. कर आकारणी, बांधकाम परवानगी यासारख्या बाबींसाठी सुलभता आणण्यासाठी गावठाणाचे नकाशे उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून गावठाणाचे नकाशे तयार केले जाणार आहेत. याद्वारे प्रत्येक मिळकतीची सीमा निश्चित होईल, तसेच त्याचे नेमके क्षेत्रही माहिती होणार असल्याने मिळकतधारक व ग्रामपंचायत यांना अधिकृत दस्तावेज उपलब्ध होणार आहे.

प्रत्येक मिळकतीची सीमा व क्षेत्र निश्चित झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला तिच्या जागेची मिळकत पत्रिका दिली जाईल. गावठाणातील घर जागेचा मालकी हक्क पुरावा व त्या आधारे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार होणार असून नागरिकांना आपल्या मिळकतीच्या सीमा व नेमके क्षेत्र माहिती होईल. मालमत्ता संबंधित अभिलेख व नकाशे तयार झाल्याने त्यांची आर्थिक पत उंचावेल, गावठाणातील जागेची मालकी हक्क संदर्भातील वाद व तंटे मिटण्यास मदत होईल. तसेच गावठाणातील जमिनीची खरेदी- विक्री व्यवहारामध्ये होणारी फसवणूक टाळता येणार आहे. 

गावातील प्रत्येक मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी करताना मदत होणार आहे. त्यामुळे जितके क्षेत्र, त्याप्रमाणातच कर भरावा लागेल. सर्व मिळकती कराच्या व्याप्तीमध्ये आल्याने ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल. 

No comments

Powered by Blogger.