Header Ads

स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

गावठाण क्षेत्रातील जागेचे मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’
ड्रोनद्वारे होणार गावठाणाचे सर्वेक्षण

वाशिम, दि. ११ (जिमाका) : स्वामित्व योजने अंतर्गत ड्रोनच्या माध्यमातून गावठाण मिळकतींची मोजणी करून संबंधितांना ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मिळकत पत्रिका) दिले जाणार आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करून त्याबाबतचा आराखडा १७ फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. आज, ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्वामित्व योजनेच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या सभेत ते बोलत होते. तालुकास्तरीय समितीचे सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेत सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विकास बंडगर यांची प्रमख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, गावठाणातील मिळकतधारकांना त्यांच्या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी स्वामित्व योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सर्व गावांमधील नमुना ८ अ अद्ययावत करणे, तसेच गावठाणाच्या सीमा निश्चित करणे आवश्यक आहे. नमुना ८ अ अद्ययावत करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांची असणार आहे, तर गावठाणाच्या सीमा निश्चित करण्याची कार्यवाही संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक भूमी अभिलेख यांची राहील.

सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून याकरिता तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने गावठाण सीमा निश्चिती व नमुना ८ अ अद्ययावत करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करून त्याचा कृती आराखडा तयार करून १७ फेब्रुवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी यावेळी सांगितले. तसेच ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व लोकप्रतिनिधींना या योजनेबाबत सविस्तर माहिती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

उपजिल्हाधिकारी श्री. विंचनकर म्हणाले, गावठाण सर्वेक्षणाचे काम कोणत्याही अडचणीशिवाय तसेच कमी कालावधीत पूर्ण होण्यासाठी योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे. याकरिता सर्व तालुकास्तरीय समिती सदस्यांनी समन्वयाने कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. याकरिता उपलब्ध मनुष्यबळ आणि गावांची संख्या याचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री. इंगळी यांनी स्वामित्व योजनेचे स्वरूप तसेच पहिल्या टप्प्यात करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती देवून सादरीकरण केले.

No comments

Powered by Blogger.