Header Ads

‘निर्भया लागली लढायला’ पथनाट्य सादर करणाऱ्या पोलिसांचा ना. जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान - ‘Nirbhaya Lagali Ladhayala’ street play

‘निर्भया लागली लढायला’ पथनाट्य सादर करणाऱ्या पोलिसांचा ना. जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : महिला सुरक्षा सारख्या विषयांवर जनजागृती करण्यासाठी ‘निर्भया लागली लढायला’ या पथनाट्याच्या माध्यमातून वाशिम पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी लोकांचे प्रबोधन करीत आहेत. या पथनाट्याचे आतापर्यंत १०४ प्रयोग झाले आहेत. या पथनाट्यात सहभागी असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा आज, ६ फेब्रुवारी रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन करण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून हा अनोखा उपक्रम राबविला जात आहे. या पथकाने आतापर्यंत व्यसनमुक्ती, मतदानाचे महत्व तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधी जनजागृती केली आहे. तसेच महिलांकरिता राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सुरक्षा योजना, निर्भया पथक, महिला सुरक्षा विशेष कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, हेल्पलाईनबाबत माहिती पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविली आहे.

पथनाट्यातून जनजागृती केल्याबद्दल वाशिम पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर सोळंके, महिला पोलीस नायक शारदा रामावत, पोलीस नायक राहुल अवचार, पोलीस शिपाई गणेश जाधव, गजानन डहाळके, विठ्ठल सुर्वे, अनिल हटकर, महिला पोलीस शिपाई संगीता ढोले, निलोफर शेख यांचा ना. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.