Header Ads

कोरोनापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Take necessary precautions to avoid corona - Collector Shanmugarajan S.

कोरोनापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्या - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

लक्षणे असल्यास तातडीने कोरोना चाचणी करा
प्राध्यापक, विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार

वाशिम, दि. ०९ (जिमाका) : आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे यासारख्या बाबींचे पालन करावे. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच तातडीने नजीकच्या कोरोना टेस्ट सेंटरमध्ये जावून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कोरोना विषयक आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना विषाणू संसर्ग अद्याप पूर्णतः संपलेला नाही. आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपण गाफील न राहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. नागरिकांनी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता अथवा मनात कोणतीही भीती न बाळगता कोरोना चाचणी करून घ्यावी. गर्दी होणाऱ्या ठिकाणी, बाजारपेठेमध्ये कोरोना चाचणीसाठी विशेष कॅम्प घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. लोकांशी सातत्याने संपर्क येणाऱ्या व्यक्तींनी या कॅम्पमध्ये आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापकांची होणार कोरोना चाचणी

शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्गाची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सुद्धा कोरोना विषयक चाचणी होणार आहे. महाविद्यालयांच्या परवानगीने कोरोना चाचणीसाठी महाविद्यालयस्तरावर सुद्धा कॅम्पचे आयोजन करण्याच्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.