Header Ads

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस - Corona preventive vaccine taken by SP washim Vasant Pardeshi

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्वांनी लस घेण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लस देण्यात येत आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनातील कोरोना लसीबाबतची शंका दूर व्हावी, याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात आज, ६ फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. तसेच ही लस सुरक्षित असून कोरोना संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून काम करणाऱ्या महसूल, पोलीस अधिकारी-कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी यांना कोरोनाची लस दिली जात आहे. याकरिता अधिकारी, कर्मचाऱ्यांची नाव नोंदणीची कार्यवाही करून त्यांना लसीकरणासाठी मोबाईलवर संदेश पाठविले जात आहेत. कोरोना लसीबाबतच्या शंका दूर करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी आज स्वतः लस घेतली.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यावेळी म्हणाले, कोरोना संसर्गाचे संकट अद्याप पूर्णतः संपलेले नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून कोणतीही भीती अथवा शंका न बाळगता ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून काम करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस घ्यावी. तसेच सर्वांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

No comments

Powered by Blogger.