Header Ads

कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Citizens should cooperate for corona test - Collector Shanmugarajan S

 

कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Citizens should cooperate for corona test - Collector Shanmugarajan S.

लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा सभा

वाशिम, दि. १५ (जिमाका) : गेल्या काही दिवसांत आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. आपल्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना बाधितांचा लवकर शोध घेवून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीसाठी घशातील स्त्राव नमुने संकलित करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी याठिकाणी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झालेली वाढ पाहता सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रुग्णांचा शोध घेवून त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरु झाल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता अधिक असते. याउलट अशा रुग्णाचे निदान होण्यास विलंब झाल्यास या बाधितांपासून त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना व इतर नागरिकांना संसर्ग होवून कोरोनाचा फैलाव होवू शकतो. तसेच कोरोना संसर्गाचे निदान होण्यास विलंब झाल्यास व लवकर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच त्वरित आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून कोरोना बाधितांचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असल्यास त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना चाचणीसाठी संकलित करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात घशातील स्त्राव नमुने संकलनाची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. तसेच ज्या कोरोना बाधितांना गृह अलगीकरणमध्ये (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले आहे, त्यांना आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार १४ दिवस निगराणीखाली ठेवावे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचा आढावा

ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे व सामग्री असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज झालेल्या सभेत सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे, सामग्रीचा आढावा घेतला. तसेच सदर उपकरणे, सामग्री लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या.


No comments

Powered by Blogger.