Header Ads

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Beti Padhao Beti Bachao

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागृतीवर भर द्या -  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

 ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा आढावा

वाशिम, दि. ०२ : जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येसारखे प्रकार होवू नयेत, यासाठी जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. याकरिता बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. तसेच प्रत्येक महिन्याला त्यांची बैठक घेवून मुलींच्या जन्मदराबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केल्या. नियोजन भवन येथे आज, २ फेब्रुवारी रोजी झालेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जिल्हास्तरीय कृती समितीच्या आढावा सभेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त श्री. तेरकर, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, स्काऊटचे जिल्हा संघटक राजेश गावंडे, फार्मशिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. पाटील, अशासकीय सदस्य डॉ. अलका मकासरे, सोनाली ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, प्रत्येक तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याने दर महिन्याला मुलींच्या जन्मदराचा आढावा घेवून त्या अनुषंगाने कार्यवाही करावी. ज्या गावामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, अशा गावांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करावी. जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या सारखे प्रकार घडू नयेत, यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच असे प्रकार घडत असल्यास त्याची माहिती गोपनीय स्वरुपात प्रशासनला सादर करावी. नागरिक, स्वयंसेवी संस्थांना स्त्रीभ्रूण हत्या विषयी काही माहिती असल्यास त्यांनी प्रशासनाला कळवावे. त्यांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल.

ज्या गावांमध्ये मुलींचा जन्मदर गेल्या काही वर्षात १ हजारपेक्षा अधिक आहे, अशा गावांचा सन्मान करण्यात येईल. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य विभागाने प्रत्येक महिन्याला अशा गावांची माहिती संकलित करावी. गावपातळीवर ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी जनजागृतीकरिता विविध उपक्रम राबवावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहिते म्हणाले, तालुका अथवा गाव पातळीवर ज्या स्वयंसेवी संस्था, समाज सेवक स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानासाठी स्वयंस्फूर्तीने काम करिता आहेत, अशा लोकांना प्रोत्साहन द्यावे. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने सभा घेवून त्यांना काही अडचणी येत असल्यास त्याची सोडवणूक करावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.