Header Ads

मोटार सायकल रॅलीद्वारे हेल्मेट वापराबाबत जनजागृती. Rto Washim Motorcycle Rally


 मोटार सायकल रॅलीद्वारे हेल्मेट वापराबाबत जनजागृती

 रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उपक्रम

वाशिम, दि. ०२ : वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात १८ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मोटारसायकल चालकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी आज, २ फेब्रुवारी रोजी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पोलीस अधीक्षक कार्यालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पाटकर, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, शहर वाहतूक शाखेचे श्री. मोहोड, जयाकांत राठोड, एस. आर. पगार, एस. ए. सोयगांवकर, एस. जी. पल्लेवाड व विभागीय नियंत्रक श्री. इलमे यांची उपस्थिती होती.

पोलीस अधीक्षक कार्यालय येथून पोलीस स्टेशन चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुनी नगरपरिषद, शिवाजी चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हा सामान्य रुग्णालय येथून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आल्यानंतर श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे स्वागत केले. पोलीस विभाग, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.