वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांत मास्क न वापरणाऱ्या ११५९ जणांवर कारवाई
वाशिम जिल्ह्यात तीन दिवसांत मास्क न वापरणाऱ्या ११५९ जणांवर कारवाई४ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल
वाशिम (जिमाका) दि. २२ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मास्क न वापरणाऱ्या ११५९ जणांवर गेल्या तीन दिवसांत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून संबंधितांकडून सुमारे ४ लक्ष ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ४ मंगल कार्यालये, २ रेस्टॉरंटवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने घराबाहेर पडताना सर्वांनी चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काढले आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारी रोजी ५०० व्यक्ती, २० फेब्रुवारी रोजी ३२० व्यक्ती आणि २१ फेब्रुवारी रोजी ३५९ व्यक्तींवर मास्क न वापरल्याने दंडात्मक कारवाई करण्यात अली आहे. त्यांच्याकडून ४ लक्ष ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ३२०, कारंजा तालुक्यातील २७५, मंगरूळपीर तालुक्यातील १०९, रिसोड तालुक्यातील १०२, मालेगाव तालुक्यातील २५८ व मानोरा तालुक्यातील ११५ व्यक्तींवर दंड आकारण्यात आला.
लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांच्याकडून १० हजार किंवा प्रति व्यक्ती २०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड वसूल करण्याचे तसेच दुसऱ्यांदा अशी बाब आढळून आल्यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन १५ दिवसांसाठी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ४ मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २ रेस्टॉरंटवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. याद्वारे ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Post a Comment