Header Ads

नैसर्गिक आपत्तीत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा



नैसर्गिक आपत्तीत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे; पीक विमा कंपन्यांच्या नफा आणि नुकसानीचे प्रमाण सुधारा

नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा

मुंबई, दि २० : लहरी पर्यावरणाचा फटका दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बसत असून पीक विमा कंपन्यांच्या  नफा आणि नुकसान याचे प्रमाण परत एकदा निश्चित करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नुकसानग्रस्तांना भरपाईची रक्कमही तोकडी असून त्याबाबतीतही  केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सांगितले.  ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही  बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.

सतत पावसामुळे झालेल्या नुकसानीतही मदत हवी

आपल्याकडे अतिवृष्टी झाली तरच नुकसान भरपाईला पात्र ठरविले जाते मात्र हे चूक असून सततचा पाऊस किंवा अवकाळी पाऊस हे देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र ठरले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की  एनडीआरएफचे निकषही २०१५ चे असून ते बदलण्यासाठी केंद्राने पाऊले उचलावीत.

पर्यावरण बदलाकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, नुकताच राज्याच्या काही भागात परत एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर सोन्यासारखी पिके परत जमीनदोस्त झाली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बदल करणे खूपच महत्त्वाचे आहे कारण पीक विमा कंपन्यांना भरपूर नफा होतो मात्र शेतकऱ्यांना त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळत नाही. या कंपन्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त नफा हा परत सरकारला मिळाला पाहिजे. त्यांच्या नफा आणि नुकसानीचे काहीतरी प्रमाण निश्चित करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. ही  भरपाई सर्व शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे.

No comments

Powered by Blogger.