Header Ads

प्राथमिक शिक्षण पदविका : प्रथम वर्ष प्रवेश

 

प्राथमिक शिक्षण पदविका : प्रथम वर्ष प्रवेश
शासकीय कोटयातील जागा प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी
ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी 22 ते 26 डिसेंबरची मुदत

वाशिम, दि. 21 (जिमाका) : प्राथमिक शिक्षण पदविका-प्रथम वर्ष सन 2020-21 या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय कोटयातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेण्यात आल्या. अद्यापही शासकीय कोटयातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीतून ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पध्दतीने प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थी हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन अर्ज करु शकतात. याबाबत सविस्तर सुचना, प्रवेश, नियमावली व अध्यापक विद्यालय निहाय रिक्त जागा याबाबतची माहिती (State Council for Educational Research and Training) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावी. खुल्या संवर्गासाठी 49.5 टक्के व खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी 44.5 टक्के गुण असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याचा कालावधी 22 ते 26 डिसेंबर 2020 असा आहे. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी करणे व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पत्र प्राप्त करण्याचा कालावधी 22 ते 27 डिसेंबर 2020 आहे. खुल्या संवर्गासाठी 200 रुपये आणि खुला संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी 100 रुपये प्रवेश शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.

ज्यांनी यापूर्वी अर्ज पुर्ण भरुन अप्रृव्ह करुन घेतला आहे, परंतू प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात. ज्यांचा अर्ज अपुर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अर्ज भरु शकतात. अर्ज ऑनलाईन अप्रृव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रीयेत समावेश होणार नाही.

या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल किंवा लॉगीनमधून प्रिंट घ्यावी. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रीयेच्या या विशेष फेरीनंतर प्राथमिक शिक्षण पदविका अर्थात डिएड प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदत देण्यात येणार नाही असे अध्यक्ष, राज्यस्तरीय डी. एल.एड. प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती पुणे तथा संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी कळविले आहे

No comments

Powered by Blogger.