Header Ads

Voting in Teacher Constituency Elections Amravati. - शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मत नोंदविण्याबाबत सूचना


Guidline for Voting in Teacher Constituency Elections MLC Amravati

 शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मत नोंदविण्याबाबत सूचना


वाशिम, दि. १७ (जिमाका) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना जारी केल्या आहेत.

या सूचनांमध्ये केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यात येऊ नये. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘१’ हा अंक लिहून मत नोंदवावे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. आपले पुढिल पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात २, ३, ४ इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ १,२,३ इत्यादी अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.

पसंतीक्रम नोंदवताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरुपात जसे I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी १, २, २ या स्वरुपात नोंदवावे. मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क ‘√’ किंवा ‘X’ क्रॉसमार्क अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. आपली मतपत्रिका वैध ठरावी, याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवावे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे

No comments

Powered by Blogger.