Header Ads

Shahid Jawan Bhushan Satai Anantat Vilin - शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन

शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन

शासकीय इतमामात अंत्यसंकार; बंदुकीच्या सात फेऱ्यांनी मानवंदना

काटोलकरांनी दिला साश्रु नयनांनी निरोप


नागपूर (महासंवाद)दि.१६:  जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात मंत्रोपचाराने अंत्यविधी  पार पडला. यावेळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद वीरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी दिला.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अपर्ण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, तसेच कुटुंबियाचे सांत्वन केले, संपूर्ण शासकिय इतमामात अंत्यसंस्काराचा विधी पार पडला.


शहिद भूषण सतई यांना ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवरुन काटोल येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरी ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे वडील रमेश सतई, आई मीराबाई सतई तसेच आप्तजनांचे सांत्वन केले.

शहिद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी संपूर्ण काटोल शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काटोलकरांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहिद भूषण सतई यांच्या पार्थिवावर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अनिल महात्मे, खासदार कृपाल तुमाने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुभेजवार, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, उपविभागीय अधिकारी उंबरकर,   तहसिलदार अजय चरडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चरणसिंग ठाकूर, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, शहीद सुपुत्राचे निकटवर्तिय उपस्थित होते. यावेळी लाखोच्या संख्येने काटोलकर व परिसरातील जनता उपस्थित होती. ‘भारत माता की जय’ च्या घोषणेत परिसर निनादून गेला होता.

शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्काराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले.

No comments

Powered by Blogger.