Header Ads

Strictly implement the code of conduct - Additional Collector Sharad Patil - आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा - अपर जिल्हाधिकारी शरद पाटील

 आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा - अपर जिल्हाधिकारी शरद पाटील

वाशिम, दि. ०६ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील सर्व अंमलबजावणी यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी शरद पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत ते बोलत होते.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उप विभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी दीपक मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अस्तित्वात असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचना आवश्यक बदल करून या निवडणुकीसाठी सुद्धा लागू आहेत. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहून या सूचनांची अंमलबजावणी करावी. नवीन योजना, कामे सुरु करणे तसेच त्याच्या घोषणा केल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक तालुक्यात एका भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर भरारी पथकांनी आपले काम चोखपणे पार पाडावे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना

अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील मतदारांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हास्तरावर २४ x ७ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तरी मतदारांना काही अडचणी अथवा तक्रारी असल्यास त्यांनी ०७२५२-२३४२३८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ०७२५२-२३२८५२ या क्रमांकावरही कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.