Header Ads

DM order Religious places reopen - जिल्ह्यातील धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली
गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना मनाई
खालील नियम व अटींसह जिल्हाधिकारी यांचे आदेश जारी

वाशिम, (जिमाका) दि. १६ :  राज्य शासनाच्या १४ नोव्हेंबर २०२० च्या आदेशानुसार विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून सोमवार, १६ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे व पुजा करण्याची ठिकाणे नागरीकांसाठी खुली करण्यात येत आहेत. याबाबतचे   (DM order Religious places reopen) आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल, १५ नोव्हेंबर रोजी निर्गमित केले.

धार्मिक स्थळे उघडण्याच्या वेळा निश्चित करणे, त्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग, हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझर उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित संस्थानचे विश्वस्त मंडळ, बोर्ड, प्राधिकार यांची राहणार आहे. तसेच याठिकाणी नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले व्यक्ती, दुर्धर आजार असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षाखालील बालके यांनी घरीच थांबावे. 

दर्शनासाठी आलेल्या नागरिकांमध्ये एकमेकांत ६ फुट अंतर ठेवावे. चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. साबणाचा वापर करून कमीत कमी ४० ते ६० सेकंद हात धुवावे. शिंकताना, खोकताना टिश्यू पेपर, हात रुमाल, हाताचा कोपरा वाकवून त्याचा वापर करावा. टिश्यू पेपरच्या वापरानंतर त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. 

आजारपणाची काही लक्षणे असल्यास नागरिकांनी राज्य हेल्पलाईन क्रमांक १०४, ०२०-२६१२७३९४ किंवा जिल्हा हेल्पलाईन ०७२५२-२३४२३८ क्रमांकावर संपर्क करावा. थुंकण्यास बंदी राहणार असून थुंकताना दिसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. संस्थानचे विश्वस्त मंडळ, बोर्ड किंवा प्राधिकारी यांनी प्रवेशाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करावी, हँड सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. कोविडची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. चेहऱ्यावर मास्क लावलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. याठिकाणी दैनंदिन कोविडची जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी पोस्टर, स्टँडीज, ऑडिओ, व्हिडीओ चित्रफितीचा वापर करावा. 

अभ्यागतांची गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. गाभारा, परिसर, व्हेंटिलेशन इत्यादी बाबी लक्षात घेऊन कमीत कमी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वेळ निश्चित करून द्यावी. बुट, चप्पल व तत्सम वस्तू नागरिकांनी आपआपल्या वाहनातच ठेवाव्यात. पार्किंगच्या ठिकाणी व आवारात गर्दी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. आवारात व बाहेर असलेल्या दुकाने इत्यादी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. नागरिकांसाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मार्किंग करून रांगा तयार कराव्यात. प्रवेश व निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. प्रवेशाच्या ठिकाणी नागरिकांनी ६ फूट शारीरिक अंतर ठेवणे आवश्यक राहील.

बैठक, आसन व्यवस्थेत  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. वातानुकूलित, व्हेंटिलेशन हॉलमध्ये सीपीडब्ल्यूडी विभागाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. ए. सी. चे तापमान  २४-३० व सापेक्ष आर्द्रता ४०-७० टक्के दरम्यान असावी. पुतळे, मुर्ती व पवित्र वस्तू यांना स्पर्श करता येणार नाही. मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारे धार्मिक कार्यक्रम, सभा यांना बंदी राहील. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता रेकॉर्ड केलेली धार्मिक गीते, संगीत वापरावे. चर्च मधील गायन स्थळ अथवा गायन गटास बंदी राहील. 

प्रार्थनेसाठी नागरिकांनी स्वत:च्या चटईचा वापर करावा. पूजा करण्याची ठिकाणे व धार्मिक स्थळांच्या आतमध्ये प्रसाद वाटप करणे, पवित्र पाणी देणे, शिंपडणे इत्यादीचे वाटप करण्यास मुभा राहील. परंतु, अर्पण करण्यास बंदी राहील. सामुदायिक किचन, लंगर्स, अन्नदानमध्ये शारिरीक अंतर ठेवून वाटप करण्यास मुभा असेल. हात-पाय धुण्याची ठिकाणी, मुतारी आदी ठिकाणी ठराविक वेळाने निर्जंतुकीकरण करावे व संसर्ग होणार नाही, याबाबत नियोजन करण्यात यावे. फेकून दिलेले फेस मास्क, ग्लोव्हज यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. 

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी काम करणारे कामगार, कर्मचारी यांनी कोविड सुरक्षितता नियमावलीनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. कामावर हजर होताना व गर्दी ठिकाणी काम करणाऱ्यांनी आठवड्यातून एकवेळ कोविड चाचणी करावी. खाद्यगृह व स्वछतागृह येथील गर्दी टाळावी. सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणची भाविक संख्या, जागा व अंतर आदींची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांना हमीपत्रासह सादर करावी. 

आजारी असलेला रूग्ण आढळून असल्यास त्याला स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवावे. सदर रुग्णाची डॉक्टरांकडून तपासणी होईपर्यंत चेहऱ्यावर मास्क लावण्यात यावा. आजारी व्यक्तीची माहिती तात्काळ नजीकच्या वैद्यकीय रूग्णालयास, स्थानिक प्रशासनास देण्यात यावी. आरोग्य विभागाकडून 'रिस्क असेसमेंट' करून प्रादुर्भाव, संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. बाधित रुग्ण आढळलेल्या ठिकाणाचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. 

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली (एसओपी) नुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही साथरोग प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड सहिंता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.