Header Ads

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी


Administration issues guidelines for public Navratri celebrations 

सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

वाशिम, दि. १३ (जिमाका) : सार्वजनिक नवरात्रोत्सव, दुर्गापूजा व दसऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंडपामध्ये गर्दी होऊ न देणे, तसेच इतर काही उपाययोजना करणायाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस प्रशासन यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगरपालिका तसेच प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षीत असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्याअनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फूट व घरगूती देवीच्या मुर्तीची उंची २ फुटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पूजन करावे. मुर्ती शादूची, पर्यावरणपुरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक नगरपालिका, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.

आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करावे. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटाझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

देवीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

नगरपालिका, नगरपंचायत, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समिती निहाय मुर्ती स्विकृती केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी. मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनासाठी आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे बघण्याची व्यवस्था करावी.

कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस व प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

No comments

Powered by Blogger.