Header Ads

वाशिमकरांचे प्रेम कधीही विसरणार नाही - हृषीकेश मोडक - मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना भावपूर्ण निरोप


वाशिमकरांचे प्रेम कधीही विसरणार नाही - हृषीकेश मोडक
मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना भावपूर्ण निरोप 
नवे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांचे स्वागत

वाशिम, दि. २६ (जिमाका) :  मणिपूर येथे ८ ते ९ वर्षे शासकीय सेवेत काम केल्यानंतर आपल्या माणसांमध्ये जावून त्यांच्यासाठी काम करण्याची इच्छा होती, ती संधी वाशिम येथे काम करतांना मिळाली. वाशिम येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना मिळालेले वाशिमकरांचे प्रेम, सहकार्य कधीही विसरणार नाही. यापुढे कुठेही गेलो तरी ते सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात मावळते जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या.

मावळते जिल्हाधिकारी श्री. मोडक यांना निरोप देण्यासाठी, तसेच नवे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या स्वागतासाठी नियोजन भवन येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. मोडक बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.


श्री. मोडक म्हणाले, वाशिम जिल्हाधिकारी पदाचा प्रभार घेतल्यानंतर गेल्या २० महिन्यात जिल्ह्याच्या, येथील माणसांच्या प्रगतीसाठी जे काही चांगले करता येईल, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी चांगले सहकार्य केले. आपल्याकडे समस्या, काम घेऊन येणारा माणूस हा आपला आहे, असे मानून काम केले, तर काम करणे अधिक सोपे होते. याच भावनेतून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना जिल्हाधिकारी पदावर बसलेल्या व्यक्तीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा, त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तसेच या पदाविषयी लोकांच्या मनात असलेला विश्वास अधिक दृढ होण्यासठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, उप वनसंरक्षक सुमंत सोळंके, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, पाणी फौंडेशनचे सुभाष नानवटे यांनी मावळते जिल्हाधिकारी श्री. मोडक यांच्या सोबत काम करतांना आलेले अनुभव आपल्या मनोगतातून सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी मावळते जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक व नवे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फतही मावळते जिल्हाधिकारी श्री. मोडक यांचा सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच नवे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांचे स्वागत करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भागत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी मानले.

चांगले उपक्रम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार : जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस.

वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून हृषीकेश मोडक यांनी वाशिम येथे अनेक चांगले उपक्रम सुरु केले. त्यांनी सुरु केलेल्या उपक्रम पुढे नेण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे शण्मुगराजन एस. यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील प्रशासकीय टीमला सोबत घेवून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.