Header Ads

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई


अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

  • पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा
  • सोयाबीन नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार

वाशिम, दि. २४ : जिल्ह्यात काही दिवसांत अतिवृष्टी, पुरामुळे पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज, २४ सप्टेंबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, पशुसंवर्धन उपआयुक्त श्री. बोरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, तेथील नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. गेल्या काही दिवसात सतत पाऊस पडत आहे, तसेच आगामी काही दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होत असून झाडावरच शेंगांना अंकुर फुटत असल्याचे दिसून येत आहे. या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कृषिमंत्री दादाजी भुसे यांना देवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा अंदाज घेवून प्राथमिक आकडेवारी तातडीने कळविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पावसामुळे व पुरामुळे काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे प्राधान्याने करून देय असलेली नुकसान भरपाई संबंधितांना त्वरित उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून नागरिकांना आपल्या घराची दुरुस्ती करण्यासाठी मदत उपलब्ध होईल. तसेच पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना सुद्धा नियमानुसार तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. द्साई यांनी केल्या.

जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी मुख्य सचिवांसोबत विशेष बैठक

पुढील आठवड्यात मुख्य सचिवांसमवेत विशेष बैठक आयोजित करून जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. विशेषतः जिल्हा परिषदेतील प्रमुख रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत यावेळी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.

आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारणीचा आढावा

जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा तसेच वाशिम येथे उभारण्यात येत असलेल्या आरटी-पीसीआर प्रयोगशाळा उभारणीच्या कामाचा आढावाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी घेतला. प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असून आगामी दहा दिवसांत ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीमुळे मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथील दोन तलाव फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले आहे. या नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही जलद गतीने करावी. तसेच जिल्हा परिषदेतील अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कामकाजात अडथळे येत असून सदर पदे त्वरित भरण्याबाबत पाठपुरावा करावा.

आमदार श्री. पाटणी म्हणाले, सध्या सोयाबीन पीक काढणीचे दिवस आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे सोयाबीन काढण्यास विलंब होत असून परिपक्व झालेल्या सोयाबीनचे पावसामुळे नुकसान होत आहे. झाडावरच शेंगांना कोंब येत असल्याने उत्पन्नात घट होणार असून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले की, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. लवकरच ही कार्यवाही पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल विहित मार्गाने शासनास सादर करण्यात येणार आहे. घरांच्या नुकसानीच्या पंचनामे सुद्धा करण्यात येत असून पंचनामे होताच देय नुकसान भरपाई तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले. तसेच जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सद्यस्थिती, प्रयोगशाळा उभारणीच्या कामाची सद्यस्थिती याविषयीची माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.