Washim Gram Panchayat Prashashak : जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींमध्ये प्रशासकाची नेमणूक
Washim Gram Panchayat Prashashak
जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींमध्ये प्रशासकाची नेमणूक
सिईओ दिपक कुमार मिना यांनी दिले नियुक्तींचे आदेश
वाशिम (जनता परिषद) दि.२४ - पाच वर्षाचा कालावधी संपणार्या जिल्ह्यातील १६३ ग्राम पंचायतींमध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मिना यांनी सर्व गट विकास अधिकार्यांना आज रोजी दिला. त्यामुळे आता १६३ ग्राम पंचायतींची धुरा ही प्रशासकांच्या हाती जाणार आहे.
जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १६३ ग्राम पंचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांचा पाच वर्षाचा कालावधी ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान संपणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत ग्राम पंचायतच्या निवडणूका घेण्यात येणार नसल्याने शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ५ वर्षाचा कार्यकाळ संपणार्या १६३ ग्राम पंचायती मध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मिना यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांना आज दिनांक २४ ऑगस्ट रोजी दिला. त्यामुळे जिल्ह्यातील ह्या १६३ ग्राम पंचायतींची धूरा आता प्रशासकाच्या हाती जाणार आहे.
प्रशासकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची
तालुक्यातील गट अ,ब व क या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांना आर्थिक व्यवहार, विविध योजना, डिजीटल स्वाक्षरी आदिंसह ग्राम पंचायतीच्या एकूण कामकाजाची माहिती देण्याकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. निवडण्यात आलेल्या प्रशासकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे. यासाठी विस्तार अधिकारी आणि सहाय्यक लेखा अधिकारी यांचे पथक नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे पथक दर आठवड्याला पंचायत समितीला भेट देऊन आर्थिक बाबींची पडताळणी करणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे.
- प्रशासक नेमलेल्या ग्राम पंचायतींची तालुकानिहाय संख्या -
१) वाशिम - २४ २) मालेगांंव - ३० ३) रिसोड - ३४ ४) मंगरुळपीर - २५
५) मानोरा - २२ ६) कारंजा - २८ *एकूण - १६३*
..... हे आहेत ग्राम पंचायतचे प्रशासक !
तालुका कृषी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, पशूधन विकास अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, सांख्यिकी विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शाखा अभियंता यांच्यावर प्रशासक म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
Post a Comment